सहकार क्षेत्राला नवसंजीवनीची आवश्यकता : राज्यपाल विद्यासागर राव, सहकार पुरस्काराचे सोलापूरात वितरण
By admin | Published: April 26, 2017 05:35 PM2017-04-26T17:35:48+5:302017-04-26T17:35:48+5:30
-
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि. २६ :- सहकार क्षेत्रापुढे सध्या अनेक आव्हाने आहेत. मात्र या आव्हानावर मात करण्यासाठी सहकार क्षेत्राला नवसंजीवनीची आवश्यकता असून सहकारी संस्थांचे व्यवस्थापन प्रशिक्षित व्यक्तींकडूनच व्हायला हवे, अशी अपेक्षा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे व्यक्त केली.
राज्य शासनाच्या सहकार, वस्त्रोद्योग आणि पणन विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सहकार पुरस्काराचे आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. जुळे सोलापूर येथील अंबर मैदानावर हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात राज्यातील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचा सत्कार करण्यात आला.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. यावेळी व्यासपीठावर सहकारमंत्री सुभाष देशमुख, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी आदी उपस्थित होते.
राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, ह्य सहकार चळवळ देशासाठी वरदान ठरेल, असे भाकित महात्मा गांधी यांनी केले होते. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु सहकार चळवळीचे खंदे पुरस्कर्ते होते. देशात सहा लाख सहकारी संस्था असून महाराष्ट्रात दोन लाखांवर संस्था आहेत. या सहकारी संस्थांच्या ठेवी आणि भांडवल फार मोठे आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून साडेचार लाख लोकांना रोजगार मिळाला आहे़
सहकार चळवळीने राज्याच्या सर्वसमावेशक, सामाजिक आणि आर्थिंक उन्नतीमध्ये मोठे योगदान दिले आहे, असे नमूद करुन राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, केवळ कृषी पतपुरवठ्यापुरती मयार्दीत असणारी सहकार चळवळ आज बँकींग, पतसंस्था, साखर उद्योग, दुग्धव्यवसाय, मत्स्य उत्पादन, पणन, अन्नपक्रिया, वस्त्रोद्योग, गृहनिर्माण अशा विविध क्षेत्रात विस्तारली आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणामध्येही योगदान दिले आहे.
राज्य शासनाने अलिकडच्या काळात सहकार चळवळीच्या विकासासाठी काही ठोस निर्णय घेतले आहेत. सहकार विभागाने सेवा हमी हक्क कायद्याखाली पाच सेवांचा समावेश केल्याबद्दल सहकार विभाग कौतुकास पात्र आहे, असेही राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी, ग्रामीण भागाशी सर्वाधिक जोडल्या गेलेल्या सहकार क्षेत्राची सध्याची व्यवस्था कठीण आहे. सहकार क्षेत्र स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले.
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सहकार क्षेत्रात रुग्णालये सुरु होण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. सहकारी संस्थांचे व्यवस्थापन नीट व्हावे आणि ही चळवळ अधिक मजबूत व्हावी यासाठी शासनाने अनेक निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सहकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 38 संस्थांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस.संधू, सहकार आयुक्त व निबंधक, सह.संस्था संभाजी कडू - पाटील, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आदी उपस्थित होते.