कोळसाचोरीला राजाश्रय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 04:24 AM2018-03-07T04:24:18+5:302018-03-07T04:24:18+5:30
वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रातून सुरू असलेली कोळसा वाहतूक चोरट्यांच्या कचाट्यात सापडली आहे. कोळसा वाहतुकीदरम्यान महिन्याकाठी लाखो टन कोळशाची चोरी होत असून या चोरीला ‘राजाश्रय’ लाभल्याने प्रशासनाचेही हात बांधले गेले आहेत.
वणी (यवतमाळ) : वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रातून सुरू असलेली कोळसा वाहतूक चोरट्यांच्या कचाट्यात सापडली
आहे. कोळसा वाहतुकीदरम्यान महिन्याकाठी लाखो टन कोळशाची चोरी होत असून या चोरीला ‘राजाश्रय’ लाभल्याने प्रशासनाचेही हात बांधले गेले आहेत. या कोळसाचोरीचा सर्वाधिक फटका वीज वितरण कंपनीला बसत आहे. वणी नॉर्थ क्षेत्रात उकणी, जुनाड, पिंपळगाव, कोलारपिपरी, भांदेवाडा, कुंभारखणी, घोन्सा अशा सात कोळसा खाणी आहेत. यांपैकी उकणी, जुनाड आणि भांदेवाडा या तीन कोळसा खाणी सुरू आहेत.
उकणी ही कोळसा खाण सर्वाधिक नफा देणारी खाण म्हणून ओळखली जाते. या खाणीतून निघणारा कोळसाही उच्च दर्जाचा आहे. त्यामुळे तस्करांचाही या खाणीवर डोळा आहे. या खाणीतून ट्रकद्वारे दिवसरात्र कोळशाची वाहतूक सुरू असते. ५० ते ६० खेपा दररोज वणीच्या रेल्वे सायडिंगवर पोहोचत्या केल्या जातात. त्यानंतर येथून रेल्वेद्वारे हा कोळसा वीज वितरण कंपनीला पोहोचविला
जातो. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी अधिक खेपा टाकल्या जातात. त्यामागेही चोरीचा उद्देश असतो. रात्रीच्या वेळी उकणी व जुनाडा खाणीतून कोळशाने भरलेला ट्रक निघाल्यानंतर मार्गात तीन ते चार ठिकाणी थांबविला जातो. या ठिकाणी अगोदरच तस्करांचे हस्तक
दबा धरून बसलेले असतात. ट्रक थांबताच, हे हस्तक ट्रकवर चढून त्या ट्रकमधून एक टनापर्यंत खोळसा खाली फेकतात. त्यानंतर ट्रक निघून जातो. खाली फेकलेला कोळसा मग हस्तकांजवळील मालवाहू पिकअप वाहनात भरला जातो. तेथून वणी येथील कोलडेपोवर आणून संबंधित व्यावसायिकांना तो विकला जातो. अशा तीन ते चार टोळ्या रात्रीच्या वेळी खाणीच्या मार्गावर कोळसा लुटण्यासाठी उभ्या असतात.
गंभीर बाब ही की, अनेक वर्षांपासून कोळशाची लूट सुरू असली तरी कोळसा तस्करांच्या मुसक्या बांधण्यात आजवर कोणालाही यश आले नाही.