...तर राज्यात लवकरच भारनियमन; कोळशाचा पुरवठा ठप्प झाल्यानं वीज संकटाची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 03:18 AM2019-09-26T03:18:01+5:302019-09-26T06:50:10+5:30
कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम; नाइलाजास्तव करावे लागेल भारनियमन
- सचिन लुंगसे
मुंबई : वेस्टर्न कोल लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी सलग तीन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्रांना कोळशाचा अपुरा पुरवठा होत आहे. याचा परिणाम वीजनिर्मितीवर होत असून, राज्यातील विजेचे व्यवस्थापन करण्यासाठी महावितरणने खुल्या बाजारातून वीज विकत घेतली आहे. राज्याची दररोजची मागणी १५ हजार मेगावॅट असून, पुरवठाही तेवढाच आहे. मात्र कोळशाचा पुरवठा कमी होत असल्याने त्याचा वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता भविष्यात महावितरणला नाइलाजास्तव भारनियमन करावे लागणार आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशामध्ये वेस्टर्न कोल लिमिटेडच्या (डब्ल्यूसीएल) कर्मचाऱ्यांनी संप केल्याने राज्यातील औष्णिक विद्युत केंद्रांना कोळशाचा अपुरा पुरवठा होत आहे. महाराष्ट्रातील विद्युत निर्मिती कंपनीची वीजनिर्मितीची क्षमता १० हजार मेगावॅटच्या वर असताना येथून केवळ २८०० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. अदानी कंपनीची क्षमता ३ हजार मेगावॅट असताना येथून १७०० मेगावॅट वीज मिळत आहे. असे असतानाही महाराष्ट्रात भारनियमन होऊ नये यासाठी महावितरण प्रयत्न करीत आहे. महावितरण सर्वसाधारण २ हजार मेगावॅट वीज खुल्या बाजारातून (पॉवर एक्सचेंज) ३ रुपये २० पैसे दराने घेत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एक्सचेंजमधील वीज ही भरवशाची नसते. या कारणात्सव वीजनिर्मिती कंपन्यांनी यातून मार्ग काढून अधिकाधिक वीजनिर्मिती करणे गरजेचे आहे. दरम्यान, उद्या कोळशाचा पुरवठा कमी झाला; किंवा वीजनिर्मिती बंद पडली तर राज्यावर भारनियमनाचे संकट ओढविणार आहे.
दररोज ३२ रॅक कोळशाची गरज
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, दररोज महानिर्मिती कंपनीला ३२ रॅक कोळशाची गरज आहे. मात्र रोज डब्ल्यूसीएलकडून १२ रॅक कोळसा मिळत आहे. कोळशाचा पुरवठा ठप्प झाला आणि वीजनिर्मिती ठप्प झाली तर महाराष्ट्र अंधारात जाईल. असे होऊ नये यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. १५ हजार मेगावॅटची मागणी असून, पुरवठाही तेवढाच आहे. आता व्यवस्थापन नीट होत आहे. मात्र भविष्याचे काय, याचे उत्तर तूर्तास कोणाकडेच नाही.