टेंडरविनाच दिली आहेत कोळसा वाहतुकीची कंत्राटे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 05:16 AM2019-01-30T05:16:50+5:302019-01-30T06:39:22+5:30
महाजनकोच्या कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर केंद्रांत एक वर्षापासून महाघोटाळा सुरू
- सोपान पांढरीपांडे
नागपूर : दोन लाख रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या खरेदी/कामासाठी निविदा (टेंडर) मागविणे कायद्याने बंधनकारक असताना, महाराष्ट्र राज्य वीजेनिर्मिती कंपनी (महाजनको) मात्र टेंडरविनाच कोट्यवधींची कोळसा वाहतूक कंत्राटे काही विशिष्ट वाहतूकदारांना वाटत आहे. महाजनकोच्या कोराडी, खापरखेडा व चंद्रपूर या तीन केंद्रांत हा महाघोटाळा एक वर्षापासून सुरू आहे.
‘लोकमत’ने केलेल्या चौकशीत हा घोटाळा उघड झाला. बहुतेक वीज केंद्रांत कोळशाचा तुटवडा नेहमीच असतो. त्याचा फायदा उठवत या तीन वीज केंद्रांचे मुख्य अभियंते केंद्र सुरू ठेवण्यासाठी तातडीने ट्रकद्वारे कोळसा वाहतुकीची परवानगी मुख्यालयाकडून मागतात. सोबत हे अभियंते काही विशिष्ट वाहतूकदारांना एखादी खाण ते वीज केंद्र अशी वाहतूक करण्यासाठी प्रति टन/प्रति कि.मी. अमूक दराने तयार आहात का? अशी विचारणा करीत. वाहतूकदाराने संमती देताच त्याची एक प्रत मुख्यालयाला पाठवून त्यालाच कंत्राट देण्याची परवानगी मागत. ती मिळताच वाहतूकदाराला एक वर्षासाठी कंत्राट दिले जाते.
महाजनको या कंत्राटदाराला जो दर देऊ करते, त्यात खरी गोम आहे. उदा. उमरेड ते कोराडी या ६० कि.मी. अंतरासाठी रु. ४.४० प्रति टन प्रति कि.मी. असा दर दिला आहे. वाहतूक क्षेत्रातील सूत्रानुसार ३.५० ते ३.७५ रुपये प्रति टन प्रति कि.मी. या दराने कुणीही वाहतूक करण्यास तयार होईल, परंतु प्रत्यक्षात कंत्राटदाराला जादा दराने काम दिले जात आहे. यात सार्वजनिक पैशाचा चुराडा होत आहे.
तसेच तात्कालिक तुटवड्यासाठी ही कंत्राटे दिली असतील, तर ती एक वर्षाच्या दीर्घ मुदतीसाठी कशी दिली जाऊ शकतात, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. अशाप्रकारे पहिले वाहतूक कंत्राट एप्रिल, २०१८मध्ये कोराडी केंद्राने दिले व त्यानंतर खापरखेडा व चंद्रपूर येथील वीज केंद्रांनीही अशीच कंत्राटे दिली. विशेष म्हणजे, ही तिन्ही वीज केंद्रे कोळसा खाणींपासून नजीक अंतरावर स्थित आहेत.
या प्रकरणाबाबत महाजनकोची बाजू जाणून घेण्यासाठी या तिन्ही केंद्रांच्या मुख्य अभियंत्यांशी संपर्क साधला, पण कुणीही अधिकृतपणे बोलण्यास तयार झाले नाही. या कंत्राटांना महाजनकोचे मुख्यालय परवानगी देते, म्हणून ‘लोकमत’ने महाजनकोच्या मुंबईच्या वांद्रे येथील मुख्यालयातील मुख्य जनसंपर्क अधिकारी महेश आफळे, मुख्य अभियंता (इंधन व्यवस्थापन), पी. एम. निखारे व कार्यकारी संचालक (कोल) आर.पी. बुरडे यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु कुणीही प्रतिसाद दिला नाही.
सात कंपन्यांवर मेहरबानी
सध्या कोराडी व खापरखेडा केंद्रात चंद्रा कोल लॉजिस्टिक्स, पंजाब ट्रान्सपोर्ट कंपनी, साकार इन्फ्रा निर्माण, एम.एफ. नैन ट्रान्सपोर्ट, खंडेलवाल अर्थ मुव्हर्स अशा कंपन्यांना ठेके दिले आहेत, तर चंद्रपूरमध्ये कॅलीबर ट्रान्सपोर्ट कंपनी व अवनीश लॉजिस्टिक्स या कंपन्या वाहतूक करीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.