महानिर्मिती-वेकोलि उभारणार कोल वॉशरी
By admin | Published: March 2, 2016 03:28 AM2016-03-02T03:28:13+5:302016-03-02T03:28:13+5:30
वीजनिर्मितीसाठी लागणारा कोळसा धुण्यासाठी महानिर्मिती आणि वेस्टर्न कोल फिल्ड्स लि. (वेकोलि) यांनी संयुक्तपणे महाराष्ट्रात ४ कोल वॉशरी उभारण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्याची प्रक्रिया सुरू होणार आहे
मुंबई : वीजनिर्मितीसाठी लागणारा कोळसा धुण्यासाठी महानिर्मिती आणि वेस्टर्न कोल फिल्ड्स लि. (वेकोलि) यांनी संयुक्तपणे महाराष्ट्रात ४ कोल वॉशरी उभारण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या कोल वॉशरीमुळे महानिर्मितीच्या कोळशाची होणारी हानी व दूरच्या खाणीतील कोळशाच्या वाहतुकीचा खर्च वाचणार असून दरवर्षी ४२१ कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. खासगी कोल वॉशरीमध्ये होणारी कोळशाची चोरी व दुय्यम दर्जाचा कोळसा यावरून मागील काळात महानिर्मिती आणि वेकोलि यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
विदर्भातील वीजनिर्मिती प्रकल्पांना लागणारा संपूर्ण कोळसा पुरविण्यास तयार असल्याचे वेकोलिचे प्रबंधक संचालक आर. आर. मिश्र यांनी सांगितले. तसेच यंदा ३० दशलक्ष टन कोळसा पुरविण्याची आमची तयारी असून दरवर्षी त्यात ५ दशलक्ष टन कोळशाची भर पडेल, असेही त्यांनी सांगितले. त्यावर ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी महानदी खदानीतून कोळसा खरेदी बंद करून वेकोलिचा कोळसा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे महानदी खदानीतून आणल्या जाणाऱ्या कोळशाच्या वाहतूक खर्चात कपात होईल. तसेच चंद्रपूर, खापरखेडा, कोराडी या वीजनिर्मिती केंद्रांना बेल्टवर कोळसापुरवठा व्हावा यासाठी लागणारे तीन बेल्ट सहा महिन्यांत तयार करण्याच्या सूचनाही ऊर्जामंत्र्यांनी या वेळी दिल्या.
नागपूरनजीकच्या महानिर्मितीच्या सर्व वीजनिर्मिती केंद्रांना वेकोलिकडे उपलब्ध असलेले पाणी नि:शुल्क देण्यास वेकोलि तयार आहे. नागपूर विभागात वेकोलिकडे ६ कोटी
गॅलन पाणी दररोज उपलब्ध असते. आगामी काळात पेंचचे पाणी बंद होण्याची शक्यता लक्षात घेता, वेकोलिचे नि:शुल्क मिळणारे पाणी वापरण्याच्या सूचना ऊर्जामंत्र्यांनी केल्या. खापरखेडा केंद्राला भानेगाव शिंगोरी येथील पाणीही वीजनिर्मितीसाठी वापरण्यास सांगण्यात आले. चंद्रपूर, खापरखेडा आणि कोराडी या तीनही वीजनिर्मिती केंद्रांना वेकोलि आपले पाणी
देणार आहे. (प्रतिनिधी)