युती, आघाडीसाठी राजकीय पक्षांमध्ये खलबतं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2016 06:33 PM2016-11-18T18:33:04+5:302016-11-18T18:33:04+5:30
अकोला महापालिकेच्या निवडणूकीच्या पृष्ठभूमीवर राजकीस पक्षात कामाला लागले आहेत; मात्र युती, आघाडीबाबत स्थानिक कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था कायम आहे.
आशिष गावंडे
अकोला, दि. १८- महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असले, तरी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्तास्थानी असलेल्या भाजप-शिवसेनेमध्ये युतीवरून व विरोधकांच्या भूमिकेत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होते किंवा नाही, या मुद्यावर स्थानिक पातळीवर संभ्रमाचे चित्र आहे. नगरपालिका निवडणुकीत चारही प्रमुख राजकीय पक्षांनी घेतलेला निर्णय व पुढील वाटचाल पाहता कार्यकर्त्यांच्या संभ्रम वाढला आहे.
फेब्रुवारी २0१७ मध्ये राज्यातील दहा महापालिकांची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. तत्पूर्वी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस नगरपालिकांच्या निवडणुका पार पडतील. कधीकाळी केंद्रासह राज्यात व महापालिकेत सत्तासूत्रे सांभाळणार्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजप-शिवसेना युतीने पूर्णपणे सफाया केला. आज रोजी केंद्रात भाजपला स्पष्ट बहुमत असून, राज्यात व महापालिकेत भाजप-सेनेची युती आहे. केंद्र व राज्यात पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ आघाडीची सत्ता टिकवून ठेवणार्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला नगरपालिका व महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा स्वायत्त संस्था ताब्यात घेण्याची संधी आहे. भाजप-शिवसेनेला विरोध करण्याची क्षमता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याची अनेकांना जाण आहे, तर दुसरीकडे मोदी लाटेत स्वार होऊन केंद्रासह राज्यात सत्ता प्राप्त करणार्या भाजपच्या नेतृत्वाचा आत्मविश्वासही कमालीचा उंचावल्याचे चित्र आहे. राज्यात भाजप-शिवसेनेची युती असली, तरी विरोधकांपेक्षा मित्रपक्ष शिवसेनेकडूनच भाजपवर सातत्याने प्रहार सुरू असतात. असे हल्ले भाजपकडून तेवढय़ाच ताकदीने परतवून लावले जातात. या सर्व राजकीय गदारोळात नगरपालिकांमध्ये युती करण्याचा निर्णय दोन्ही राजकीय पक्षांनी जाणीवपूर्वक दिरंगाईने घेतल्याचे लक्षात येते. एकमेकांची ताकद सिद्ध करण्यासाठी ही रस्सीखेच सुरू असतानाच काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी करण्याच्या मुद्यावरून परिस्थिती फारशी भिन्न नसल्याचे चित्र आहे. परिणामी, युती किंवा आघाडी न करता चारही राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी बाह्या वर खोचल्या आहेत.
त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीतदेखील युती व आघाडी होणार किंवा नाही, असा प्रश्न कार्यकर्त्यांना सतावतो आहे.
स्वबळावरच होतील लढती
सध्या राज्यात नगरपालिका, महापालिका व विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या प्रत्येक निवडणुकीत राजकीय समीकरणांची गोळाबेरीज करून युती किंवा आघाडी करायची किंवा नाही, याची चाचपणी सुरू असल्याचे दिसून येते. भारतीय जनता पार्टीचे प्रादेशिक राजकीय पक्षांबद्दलचे धोरण पाहता शिवसेना युतीबद्दल इच्छुक नसल्याचे बोलल्या जात आहे. त्याचे परिणाम काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्तास तरी आगामी मनपा निवडणुका स्वबळावरच लढल्या जातील, अशी चिन्हं दिसत आहेत.
बिगुल वाजण्याची प्रतीक्षा
नगरपालिका निवडणुकीत युती असल्याची घोषणा भाजप-शिवसेनेने केली तोपर्यंत बराच उशीर झाला होता. इच्छुक उमेदवारांना ह्यएबी फॉर्मह्णचे वाटप झाल्याची सबब पुढे करीत दोन्ही मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत. हीच परिस्थिती काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये असल्याचे चित्र आहे. अर्थातच, स्थानिक पातळीवर मनपा निवडणुकीसाठी युती किंवा आघाडी गृहीत न धरता भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी केली. संबंधित पक्षांकडून केवळ बिगुल वाजण्याची प्रतीक्षा केली जात आहे. हा बिगुल वाजणार किंवा नाही, याबद्दल मात्र कायकर्त्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे.