दलित समाजाला लक्ष्य करण्यासाठीच कोम्बिंग, कॉंग्रेसचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 01:40 AM2018-01-12T01:40:19+5:302018-01-12T01:40:31+5:30
कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदनंतर पोलिसांकडून सध्या कोम्बिंग आॅपरेशन सुरू आहे. रात्री अपरात्री घरात घुसून तरुण, महिला, अल्पवयीन मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना विनाचौकशी अटक करण्याचे काम सध्या पोलीस दलाकडून सुरू आहे. दलित समाजाला लक्ष्य करून सुरू असलेले कोम्बिंग आॅपरेशन ताबडतोब थांबविण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदनंतर पोलिसांकडून सध्या कोम्बिंग आॅपरेशन सुरू आहे. रात्री अपरात्री घरात घुसून तरुण, महिला, अल्पवयीन मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना विनाचौकशी अटक करण्याचे काम सध्या पोलीस दलाकडून सुरू आहे. दलित समाजाला लक्ष्य करून सुरू असलेले कोम्बिंग आॅपरेशन ताबडतोब थांबविण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
राज्यात आतापर्यंत विविध ठिकाणांहून दलित समाजाच्या हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे. मात्र, कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी आरोप दाखल झालेल्या मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांच्यावर मात्र अद्याप कसलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे मनुवादी विचारधारेच्या सरकारच्या इशाºयावर पोलीस कारवाई करत आहेत अशी भावना दलित समाजात निर्माण झाल्याचे प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले. दलित समाजाला लक्ष्य करून सुरू असलेल्या या अटकसत्राचा काँग्रेस तीव्र शब्दांत निषेध करीत असून राज्य सरकारने हे कोम्बिंग आॅपरेशन तत्काळ थांबवावे, अशी मागणीही सावंत यांनी केली.
आंबेडकरांचा विरोध
भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोम्बिंग आॅपरेशन बेकायदा असल्याचे म्हटले आहे. कोम्बिंग ही लष्करी कारवाई असते. नागरी भागात अशा प्रकारची कारवाई करता येत नसल्याचा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोम्बिंग आॅपरेशन थांबविण्याची मागणी आंबेडकर यांनी अलीकडेच केली. कोम्बिंग बाबत नियमावली तयार करण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचेही आंबेडकरांनी स्पष्ट केले होते.
कोरेगाव-भीमाच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी- संभाजी राजे यांची मागणी
अकोला : कोरेगाव-भीमाच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, यामध्ये कोणत्याही धर्माचे-जातीचे व्यक्ती दोषी असले तरी चालेल, त्यांच्यावर गंभीर कारवाई झाली पाहिजे, त्यांना कोणीही पाठीशी घालू नये अशी प्रतिक्रिया खासदार संभाजी राजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्थानांतरण कार्यक्रमानंतर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, फुले-आंबेडकर-शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना निंदनीय आहेत. बहुजन समाजाने शांत राहून समाजात अशा घटना घडू नये, यासाठी प्रयत्न करावेत. कोरेगाव-भीमाच्या निमित्ताने दलित-मराठा यामध्ये कुठेही वितुष्ट निर्माण होऊ नये, यासाठी आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरेगाव-भीमाच्या घटनेप्रकरणी संभाजी भिडे-मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला; मात्र अटकेची कारवाई नाही, असे का, असा प्रश्न विचारला असता, याचे उत्तर मी नव्हे पोलीस देतील, असे ते म्हणाले. कोरेगाव-भीमाच्या घटनेमुळे हिंदुत्ववादी संघटनांचा जोर वाढला असे वाटत असेल तर ते चौकशीतून समोर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.