युतीचे सरकार हे हवामान खात्यासारखे - अशोक चव्हाण
By Admin | Published: July 4, 2016 04:18 AM2016-07-04T04:18:39+5:302016-07-04T04:18:39+5:30
राज्यातील भाजपा आणि शिवसेना युतीचे सरकार हे हवामान खात्यासारखे आहे.
औरंगाबाद : राज्यातील भाजपा आणि शिवसेना युतीचे सरकार हे हवामान खात्यासारखे आहे. हवामान खाते जसे सांगते एक आणि घडते दुसरेच. तशीच या सरकारची परिस्थिती आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथे युती सरकारची खिल्ली उडविली.
जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी खा. चव्हाण येथे आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, हवामान खाते जे सांगते ते घडत नाही. तसेच या सरकारच्याही निव्वळ घोषणा आहेत. प्रत्यक्षात अंमलबजावणी काहीच नाही. युती सरकार म्हणजे (इज इक्वल टू) इंडियन मेटरॉलॉजिकल डिपार्टमेंट, असा उल्लेख त्यांनी केला. मराठवाड्यासह राज्याच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. एकही नवीन उपक्रम नसलेले हे सरकार आहे. जुन्या योजनांना नवीन नावे देण्याचा एकमेव कार्यक्रम हे सरकार राबवत आहे, अशी टीका त्यांनी केली. प्रशासकीय कामात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमी पडत असल्याचे खा. चव्हाण म्हणाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचा प्रभाव कमी झाला का, या प्रश्नाला त्यांनी खुबीने टाळले. विरोधी पक्षनेते म्हणून राधाकृष्ण विखे पाटील उत्तम काम करीत असल्याचे ते एका प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणाले. खडसेप्रकरणी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींकडून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी
केली. (प्रतिनिधी)
शिक्षक
मतदारसंघाचा विचार
मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी आपल्याकडे अर्ज आले आहेत. तेथे उमेदवार देण्याबाबत विचार होत आहे. महिनाअखेरपर्यंत त्यावर निर्णय करू. पदवीधर मतदारसंघासाठीसुद्धा काँग्रेसचा विचार चालू आहे, असे खा. चव्हाण म्हणाले.