युती झाल्यास बंडखोरांवर मनसे तरणार
By admin | Published: January 17, 2017 04:31 AM2017-01-17T04:31:42+5:302017-01-17T04:31:42+5:30
शिवसेना-भाजपाची युती झाली, तर त्या दोन्ही पक्षातील असंतुष्ट, बंडखोर, नाराजांची फौज बाहेर पडेल आणि त्यांचा फायदा आपल्याला उठवता येईल
ठाणे : शिवसेना-भाजपाची युती झाली, तर त्या दोन्ही पक्षातील असंतुष्ट, बंडखोर, नाराजांची फौज बाहेर पडेल आणि त्यांचा फायदा आपल्याला उठवता येईल, असा मनसेच्या ठाण्यातील नेत्यांचा होरा आहे. युतीसोबतच अन्य पक्षातील प्रमुख नाराजांवरही त्यांचे लक्ष
आहे. पक्षाचे नेते याबाबत
स्पष्टपणे काहीही सांगण्यास तयार नाहीत. मात्र आमच्याकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
ठाणे शहरात मनसेकडे स्वत:चे असे सांगण्याजोगे खास काम नाही. त्यामुळे मध्यंतरी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नाशिकच्या सहली काढून तेथील कामांची पाहणी केली. त्या कामांच्या जोरावर येथील मतदारांचे प्रबोधन करायचे आणि तसा विकास आम्ही ठाण्यात करू, असे कल्याण-डोंबिवलीप्रमाणे सांगायचे. त्या आधारे मते मागायची, असा त्यांचा प्रयत्न आहे.
शिवसेना-भाजपाची युती झाल्यास त्या दोन्ही पक्षातील नाराजांना मनसे हाच योग्य पर्याय असेल, अशी पक्षाच्या निवडणुकीच्या रिंगणात रंगली आहे. अशा बंडखोरांवर मनसेचीही पाळत असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
यंदाच्या निवडणुकीत चार वॉर्डांचा एक प्रभाग झाल्याने तिकीट कोणाकोणाला द्यायचे हा यक्षप्रश्न आहे. त्यात तेथील आरक्षणाचे सर्व निकष पूर्ण करावे लागणार आहेत. मनसेकडे सध्या इच्छुक भरपूर असले, तरी त्यातील अनेकांमध्ये फक्त उत्साह आहे. पुरेसा अनुभव नाही. नव्या रचनेतील प्रभागाचा आकार सांभाळण्याची त्यांची क्षमता नाही, असे नेत्यांचे म्हणणे आहे.
युती संदर्भात शिवसेना-भाजपच्या बैठका सुरू आहे. त्यांच्या निर्णयावर दोन्ही पक्षांच्या इच्छुक उमेदवारांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. युती झाल्यास या दोन्ही पक्षांतील नाराज इच्छुक फुटून मनसेचा रस्ता धरतील. ज्या ठिकाणी मनसेचे पारडे कमजोर आहे अशा ठिकाणी या बंडखोरांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मनसेचे भविष्यही या बंडखोरांच्या प्रवेशावर अवलंबून असल्याची चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)
>युतीतून होतेय विचारणा
युती झाली, तर आम्हाला मनसेत प्रवेश मिळेल का? अशी विचारणा दोन्ही पक्षांतील काही इच्छुक उमेदवारांनी केल्याचे मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी मान्य केले.
शिवसेनेचे माजी नगरसेवक एकनाथ काजारी हे आमच्याकडून उमेदवारी अर्ज घेऊन गेल्याची माहिती जाधव यांनी दिली.
शिवसेनेचे १२-१४ शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष, महत्त्वाचे पदाधिकारी, नगरसेवक, भाजपमधील काही जण मनसेच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.