युती मजबूत आणि आमचं ठरलंय; उध्दव ठाकरेंनी घेतले खासदारांसह अंबाबाईचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 03:09 PM2019-06-06T15:09:54+5:302019-06-06T15:13:53+5:30
कोल्हापुरात आगमन होताच उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांडून जोरदार स्वागत करण्यात आले.
कोल्हापूर : युती मजबूत आहे, आमचं ठरलंय, असे सांगत विधानसभेच्या जागावाटपावरून होत असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. ठाकरे यांनी शिवसेनेच्या नवनियुक्त खासदारांसह कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले.
कोल्हापुरात आगमन होताच उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांडून जोरदार स्वागत करण्यात आले. अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
केंद्रातील मोदी सरकारकडून पुन्हा एकदा अवजड उद्योग मंत्रीपद देण्यात आल्याने शिवसेना नाराज असल्याच्या चर्चा झडत होत्या. यावर उद्धव ठाकरेंनी युती मजबूत असल्याचे स्पष्ट केले. आमची कोणतीच नाराजी नाही. पण इच्छा व्यक्त करणं चुकीचं नाही. आमचं ठरलं आहे, असे सांगत त्यांनी जागावाटपावरूनही काही वाद नसल्याचे स्पष्ट केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करून कोल्हापूर जिल्ह्यातून दोन खासदार देणाऱ्या जनतेला त्यांनी यावेळी मानाचा मुजरा केला.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासमवेत आणि सर्व खासदारांच्यासह अंबाबाईचे दर्शन घेतले.