किनवट पालिका भाजपाच्या ताब्यात, राष्ट्रवादीकडून सत्ता हिसकावली, शिवसेनेला भोपळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:18 AM2017-12-15T00:18:35+5:302017-12-15T00:18:44+5:30
किनवट पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षासह नगरसेवक पदाच्या ९ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले़ सत्ताधारी राष्ट्रवादीला मागच्या तुलनेत दोन जागा कमी मिळाल्या आणिा सत्ताही गमवावी लागली.
किनवट (जि़ नांदेड) : किनवट पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षासह नगरसेवक पदाच्या ९ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले़ सत्ताधारी राष्ट्रवादीला मागच्या तुलनेत दोन जागा कमी मिळाल्या आणिा सत्ताही गमवावी लागली़ शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही़ विसर्जित पालिकेत भाजपचा एकही नगरसेवक नव्हता, हे विशेष़
१३ डिसेंबर रोजी पालिकेसाठी मतदान झाले होते़ १४ डिसेंबर रोजी मतमोजणी झाली़ यात भाजपाने नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकत ९ जागा पटकाविल्या़ राष्ट्रवादी काँग्रेसने ६, काँग्रेसने २ तर एका अपक्षाने बाजी मारली़
भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंद मच्छेवार यांनी काँग्रेसचे शेख चाँदसाब रतनजी यांचा पराभव केला़ मच्छेवार यांना ६ हजार ३५८ तर शेख चाँदसाब यांना ४ हजार ५४७ मते मिळाली़ राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर हबीबोद्दीन चव्हाण यांनी २ हजार ९८१, राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार प्रवीण राठोड यांना २ हजार ७४८, शिवसेनेचे सुनील पाटील यांना केवळ १ हजार ३०२ मते मिळाली़
फुलंब्रीतही कमळ फुलले
फुलंब्री (जि. औरंगाबाद) : फुलंब्री येथील प्रतिष्ठेच्या पहिल्याच नगर पंचायत निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत विरोधकांना धूळ चारली. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुहास शिरसाठ यांनी शहर विकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांचा १९० मतांनी पराभव केला. शिवाय १७ पैकी ११ नगरसेवकही भाजपचेच विजयी झाले. शहर विकास आघाडीला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले. एमआयएमला या निवडणुकीत एक जागा मिळाली. नगर पंचायतसाठी बुधवारी मतदान झाले. गुरुवारी सकाळी तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सर्व निकाल हाती आले. भाजप पॅनलच्या विरोधात काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येऊन शहर विकास आघाडी केली होती. परंतु मतदारांनी या आघाडीला धूळ चारली.
जिंतुरात राष्ट्रवादी विजयी
जिंतूर (जि. परभणी) : येथील वॉर्ड क्रमांक ८ मधील एका रिक्त जागेसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार परवीन तहजीब जानीमियाँ या ७९६ मतांनी विजयी झाल्या. १० वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे. शहरातील वॉर्ड क्रमांक ८ मधील एका रिक्त जागेसाठी बुधवारी ६४.६४ टक्के मतदान झाले होते. गुरुवारी शहरातील नगरपालिकेच्या सभागृहात मतमोजणी झाली. यात परवीन तहजीब जानीमियाँ यांना १ हजार २५१ मते मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवार शहाजीया बेगम रफीक यांना ४५५ मते मिळाली.
हुपरी नगराध्यक्षपदी भाजपाच्या गाट
हुपरी (जि. कोल्हापूर) : हुपरी (ता. हातकणंगले) नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपाच्या जयश्री महावीर गाट यांनी नगराध्यक्षपदावर २,०५७ मतांच्या फरकाने निर्विवाद विजय मिळवला. नगर परिषदेच्या १८ जागांपैकी भाजपाला ७, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीला ५, शिवसेना २, मनसे प्रणीत अंबाबाई विकास आघाडीला २ व अपक्ष २ (शिवप्रतिष्ठान संघटनेचे) असे नूतन सभागृहात पक्षीय बलाबल झाले आहे. या पहिल्याच निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत नाही़