कोस्टगार्ड निष्क्रिय ; पोलीस हताश, बुडत्या मच्छिमारांना आधार तरफ्याचाच

By admin | Published: August 24, 2016 03:15 AM2016-08-24T03:15:28+5:302016-08-24T03:15:28+5:30

शासन स्तरावरून करण्यात येत असला तरी वादळ, वाऱ्यात सापडलेल्या मच्छीमारांच्या रक्षणासाठीच त्यांचे हात थिटे का पडतात?

Coastguard inactive; Police are on the basis of the despair, the fishermen on the base | कोस्टगार्ड निष्क्रिय ; पोलीस हताश, बुडत्या मच्छिमारांना आधार तरफ्याचाच

कोस्टगार्ड निष्क्रिय ; पोलीस हताश, बुडत्या मच्छिमारांना आधार तरफ्याचाच

Next

हितेन नाईक,

पालघर- सागरी सुरक्षेसाठी नेव्ही आणि कोस्टगार्ड समुद्रातील एक सक्षम सुरक्षा यंत्रणा असल्याचा दावा शासन स्तरावरून करण्यात येत असला तरी वादळ, वाऱ्यात सापडलेल्या मच्छीमारांच्या रक्षणासाठीच त्यांचे हात थिटे का पडतात? असा साधा सरळ प्रश्न मच्छीमारामधून आता विचारला जाउ लागला आहे. झांई येथील दोन ट्रॉलर्स बुडून १५ खलाशी कामगार आपला जीव वाचिवण्यासाठी नेव्ही-कोस्टगार्ड या सक्षम यंत्रणेच्या मदतीची वाट बघत असताना शेवटी आपले प्राण वाचविण्यासाठी त्या मच्छिमारांना आपल्या ट्रॉलर्स मधील बुडया (तरंगते फ्लोटस) चा तराफा बनवून सुरक्षित किनारा गाठावा लागला.
मुंबई वरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर समुद्रातील सुरक्षा यंत्रणेचे पितळ पुरते उघडे पडले होते. या सुरक्षा यंत्रणेतील उणिवा भरून काढण्याच्या दृष्टीने शासन युद्धपातळीवर कामाला लागून हावरक्राफ्ट स्पीड बोटी, सह कोटयावधी रुपयांची उपकरणे, साहित्य शासनाने खरेदी करून किनारपट्टीवरील गावात सागरी पोलीस स्थानकांची उभारणी केली. मात्र त्यांना हवी असणाऱ्या अत्याधुनिक बंदुका, रायफल्स, स्पीड बोटी, पुरेसे मनुष्यबळ पुरविण्यात शासन अपयशी ठरले. त्यामुळे आजही पालघर तालुक्यातील गावासमोरील समुद्रात काही संशयास्पद हालचाली अथवा बोटी दिसून आल्यास त्याच्या शोध घेण्यासाठी सातपाटी, केळवे, पोलिसांना डहाणू, वसई किंवा स्थानिक मच्छीमारांच्या बोटीवर अवलंबून रहावे लागत आहे.
शासनाने खरेदी केलेल्या स्पीड बोटी या वादळी वारे आणि तुफानी लाटाचा सामना करण्यास सक्षम नसल्याचे अनेक घटना मधून सिद्ध झाल्याने समुद्रात अडकून पडलेल्या मच्छिमारी नौका आणि त्यावरील खलाशी कामगारांची सुटका करण्याचे दिव्य सातपाटी येथील मच्छीमार अनिल चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आता पर्यंत तीन वेळा करून दाखिवले आहे. २६/११ हल्या नंतर स्पीड बोटीसह काट्यवधी रु पयांची सुरक्षा साहित्याची झालेल्या खरेदी नंतर आपली सुरक्षायंत्रणा किती सक्षम आणि कार्यक्षम बनली हा आता वादाचा विषय असून याचे उत्तर शासनालाही नीटसे देता येणार नाही.
मच्छिमारांना आलेले कटू अनुभव
सन २०१५ मध्ये गुजरात राज्यातून मुंबई कडे जाणारी वेलांकनी ट्रॉलर्स चार खलाश्यासह समुद्रात दोन दिवस पासून अडकून पडलेली असताना, तसेच ७ आॅगस्ट २०१६ रोजी सातपाटी ची न्यूधवल ही बोट आणि त्यातील १४ खलाशी तीन दिवसा पासून समुद्रात अडकून पडले असताना कोस्टगार्ड, नेव्ही या यंत्रणेला त्यांना वाचविण्या संबंधित कळवूनही त्यांच्या कडून वेळीच मदत न मिळाल्याने शेवटी स्थानिक मच्छिमारांना आपल्या बोटी समुद्रात उतरवून बोटी व त्यातील मच्छिमारांची सुटका करावी लागली होती. अशा अनेक घटना या पूर्वीही घडल्या आहेत. त्यामुळे सक्षम अशा संरक्षण यंत्रणेकडून जर वेळीच मदतकार्य उपलब्ध होत नसेल तर केंद्र आणि राज्य शासनाने सागरी पोलीस स्टेशनला स्पीड बोटीसह सर्व अद्ययावत सामग्रीचा पुरवठा करून २२ नॉटिकल समुद्री क्षेत्राच्या रक्षण व सहाय्याचे अधिकार त्यांना बहाल केल्यास स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने समुद्रातील संकटग्रस्तांना तात्काळ मदतकार्य उपलब्ध होऊन त्यांच्या मधील अनेक वर्षांपासूनचे वाद आणि संघर्ष मिटण्यास ही मदत होणार आहे.
समुद्रातील सुरक्षा यंत्रणेचे खरे डोळे तुम्हीच आहात अशी मच्छिमारांची भरभरून स्तुती कोस्ट गार्ड आणि नेव्हीचे अधिकारी बैठकी दरम्यान नेहमी करीत आले असतांना व मच्छिमारानीही ते आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, या भावनेतून मान्य करून स्थानिक पोलीस, नेव्ही, कोस्टगार्ड ई. यंत्रणांना आता पर्यंत मदतच केली आहे. परंतु त्याची कुठलीही जाणीव न ठेवता नेव्ही आणि कोस्टगार्डचे अधिकारी समुद्रात मच्छीमारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याच्या दरम्यान एखादे कागदपत्र कमी आढळल्यास त्यांना नग्न करून अमानुषपणे मारहाण करीत असल्याच्या तक्र ारी मच्छिमारांनी अनेक वेळा केल्या आहेत. संकटा दरम्यान आपल्याला मदत करणाऱ्यांची उपेक्षा करणाऱ्या व छोट्या चुकांसाठी समुद्रात बेदम मारहाण करणाऱ्या या संरक्षण यंत्रणेला आपण कितपत सहकार्य करावे अशी भावना मच्छीमारांत निर्माण होऊ पाहते आहे. त्यामुळे संरक्षण यंत्रणा आणि स्थानिक मच्छीमारामधील दरी वाढते आहे. ती कमी करणार कोण?
>असा घडला बाका प्रसंग, तटरक्षक दल आलेच नाही, पोलिसांनी दिला शाब्दिक दिलासा
समुद्रात ४ जून ते २२ आॅगस्ट दरम्यान १९ वेळा समुद्रातील पाण्याला मोठी भरती येऊन पाण्याच्या उच्चतम पातळीत मोठी वाढ होणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. त्या अनुषंगाने २२ आॅगस्ट रोजी डहाणूच्या झांई गावातून मुंबई कडे जाणारी हस्तसागर ट्रॉलर्स ही त्या उच्चतम भरती आणि तुफानी लाटा मध्ये सापडून बुडत असताना त्यांना वाचविण्यासाठी गेलेली कृष्णसागर ट्रॉलर्सही खडकावर आदळून बुडाल्या होत्या.
त्यामधील १५ खलाशी समुद्रात बुडत असतांना त्यांनी आपल्या मोबाईलवरून स्थानिक पोलिसांना कळवून कोस्टगार्ड, नेव्ही या सुरक्षा यंत्रणेच्या मदतीची विनंती केली होती. मात्र अनेक तास वाट पाहूनही मदत उपलब्ध होत नव्हती. त्यांच्या मदतीचीे सहा तासांहून अधिक काळ वाट पाहूनही ती आली नाही.
मात्र स्थानिक पोलिसांकडून मात्र तुम्ही घाबरू नका, आम्ही मदत घेऊन निघालोय हे धीराचे शब्द त्यांना मोठे बळ देत असल्याचे माच्छी यांनी सांगितले. तुफानी लाटांचा मारा झेलणाऱ्या मच्छिमारांनी शेवटी जीव वाचविण्याच्या दृष्टीने एकजूट दाखवून मच्छिमारी जाळ्याच्या बुडया कापून त्याचा तरफा बनवून किनारा सुरक्षित गाठण्यात यश मिळविले होते.पालघर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षिका शारदा राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर, पो.नि.दुर्गेश शेलार ह्या पोलीस अधिकाऱ्यांनी झाई, घोलवड किनाऱ्यावर पहाटे पर्यंत तळ ठोकला होता. व गुजरात राज्यातील पोलीस आणि मच्छीमारांच्या मदतीने आपले मदतकार्य सुरूच ठेवले होते. प्रांताधिकारी, तहसीलदार, बंदर अधिकारी नवनीत निजाई,तलाठी ई, यंत्रणा मदतकार्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असतांना कोस्ट गार्डच्या एका अधिकाऱ्याला स्थानिक मच्छीमाराचे फोन उचलण्यात स्वारस्य नसावे या बाबत मच्छीमारांमधून तीव्र भावना उमटत आहेत.
पालघर जिल्ह्याला १०७ किमीचा समुद्रकिनारा लाभला असून संशयित, दहशतवादी हालचालीवर लक्ष पुरवण्यासाठी सातपाटी, केळवे, अर्नाळा या तीन सागरी पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात आली.त्यांच्या दिमतीला सात स्पीड बोटी तैनात करून २९ कोस्टल चेकपोस्ट, ६२ लँडिंग पॉर्इंट तयार करून पोलिसांनी नागरिकांची सुरिक्षतता अभेद्य बनवली आहे.
>टोल फ्री नंबर त्याच्या पत्नीकडे
समुद्रात बुडत असलेले १५ खलाशी आपले प्राण वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असल्याने त्यांना तात्काळ मदत करा अशी याचना कोस्ट गार्डच्या टोल फ्री नंबरवर एका मच्छिमाराने फोन करून केली असता, तो फोन आपल्या बायकोकडे देऊन आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे भाजपाचे तलासरीचे आमदार पास्कल धनारे यांनी लोकमतला सांगितले आहे.
समुद्रात मच्छिमारांना मदतीची गरज असते. तेव्हा ती का मिळू शकत नाही याचा शोध घेऊन योग्य त्या उपाययोजना आखण्याच्या दृष्टीनेही आपण केंद्रात वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Coastguard inactive; Police are on the basis of the despair, the fishermen on the base

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.