अंबाबाई मूर्तीवर आजपासून कोटिंग
By admin | Published: July 31, 2015 01:09 AM2015-07-31T01:09:03+5:302015-07-31T09:29:16+5:30
अंबाबाई मूर्तीवर सुरू असलेल्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेत शुक्रवारपासून बिब्याचे तेल आणि बेहड्याचा अर्क वापरून कोटिंगचे काम सुरू करण्यात येणार आहे.
कोल्हापूर : अंबाबाई मूर्तीवर सुरू असलेल्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेत शुक्रवारपासून बिब्याचे तेल आणि बेहड्याचा अर्क वापरून कोटिंगचे काम सुरू करण्यात येणार आहे. श्री जगदंबेच्या राज्याचा कोतवाल आणि करवीर क्षेत्रातील सर्वांच्या खऱ्या-खोट्याचा हिशेब ठेवणाऱ्या रंकभैरवाला उद्देशून रंकभैरव विधान संपन्न झाले.
अंबाबाई मूर्ती स्वच्छतेनंतर गेले दोन दिवस मूर्तीचे अंतर्गत मजबुतीकरण करण्यासाठी ‘इथिल सिलिकेट’ हे रसायन इंजेक्शनद्वारे सोडण्यात आले. ही प्रक्रिया अतिशय संथगतीने होते. एक प्रक्रिया पूर्ण होऊन ती वाळल्यावर पुढची प्रक्रिया सुरू केली जाते. आजपासून मूर्तीला बिब्याचे तेल आणि बेहड्याचा अर्क वापरून कोटिंग करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया दोन दिवस चालेल. त्यानंतर दुर्वांचा रस वापरून कोटिंग केले जाईल.
कोल्हापुरातील प्रख्यात संस्कृत अभ्यासक वि. गो. देसाई यांनी श्रीदेवी भागवत नवाह पारायण केले तसेच श्रीदेवी भागवत कथा निरूपणकार श्री विश्वास घोडजकर यांचा पंडित राजेश्वर शास्त्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. (प्रतिनिधी)