पालिका प्रचाराचा नारळ फुटणार?
By admin | Published: June 19, 2016 02:55 AM2016-06-19T02:55:14+5:302016-06-19T02:55:14+5:30
शिवसेनेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी सायंकाळी ५ वाजता गोरेगावात विशेष मेळावा होत असून, मित्रपक्ष भाजपाबरोबर सुरू असलेल्या कलगीतुऱ्याच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला
मुंबई : शिवसेनेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी सायंकाळी ५ वाजता गोरेगावात विशेष मेळावा होत असून, मित्रपक्ष भाजपाबरोबर सुरू असलेल्या कलगीतुऱ्याच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या वेळी शिवसैनिकांना कोणता आदेश देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा सेनेकडून एक प्रकारे आरंभ केला जाणार आहे. त्यामुळे उद्धव यांच्या भाषणाबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिलेली आहे.
मुंबईसह राज्यात व केंद्रातील सत्तेत भागीदार असलेल्या भाजपा-सेना युतीमधील कलह लपून राहिलेला नाही. उलट गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी ऐकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. पालिकेच्या विषयांपासून माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर झालेल्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी सेनेने अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. त्याला भाजपानेही जोरदार प्रत्युत्तर दिल्याने, त्यांच्यातील कलगीतुरा दिवसेंदिवस रंगू लागला आहे. एकमेकांना निजामाचे बाप, रझाकार म्हणून संबोधण्याबरोबरच, ‘सामना’ व ‘तरुण भारत’ या मुखपत्रांतून तोंडसुख घेतले आहे. त्याचबरोबर, सोशल मीडियावरूनही त्यांच्यात चकमकी झडत असल्याने, आगामी पालिकेच्या निवडणुका दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढतील, अशीच चिन्हे वर्तविली जात आहेत. भाजपाचे शनिवारपासून पुण्यात चिंतन शिबिर सुरू झाले असून, त्यामध्ये कोणती भूमिका मांडली जाते, याकडे सेना नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी होणारा वर्धापन दिन मेळावा महत्त्वपूर्ण ठरतो, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना कोणता आदेश देतात, भाजपा नेत्यांच्या टीकेला काय उत्तर देतात, यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात उद्याच्या मेळाव्यातून होणार आहे. (प्रतिनिधी)
खासदार-आमदारांची उपस्थिती
गोरेगावातील राष्ट्रीय प्रदर्शन केंद्र मेळाव्याची सेना नेत्यांनी तयारी केली असून पक्षाचे मंत्री, खासदार-आमदार, तसेच राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात पक्षाच्या ५० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या चित्रफितीचे सादरीकरण करण्यात येणार असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निवडक भाषणाच्या ध्वनिफित, तसेच त्यांच्या सभा, मेळाव्याच्या चित्रांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.