कोकणची वाईन उद्योजकांच्या प्रतीक्षेत
By admin | Published: January 16, 2015 11:18 PM2015-01-16T23:18:36+5:302015-01-16T23:44:56+5:30
सात वर्षे फॉर्म्युले पडूनच : कोकणातील आंबा, करवंद, जांभळावरील वायनरी संकटात
रत्नागिरी : कोकणात आंबा, काजू, करवंद, कोकम, चिकू, फणस या फळांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, प्रक्रियेअभावी लाखो टन फळे वाया जातात. हे लक्षात आल्यानंतर तत्कालीन कुलगुरु डॉ. विजय मेहता यांनी वायनरी संशोधन प्रकल्पाला मंजुरी दिली व द्राक्षाच्या धर्तीवर या फळांपासून वाईन तयार करण्यात शास्त्रज्ञांना यशही आले. मात्र, विद्यापीठाने तयार केलेल्या वाईन प्रकल्पाला ७ वर्षे उद्योजकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने कृषी विद्यापीठाच्या वाईन निर्मितीला राजमार्ग मिळालेला नाही.२००७ साली या प्रकल्पातून २२ लाख रुपये खर्चून वाईन निर्माण केली गेली. लाखो टन वाया जाणाऱ्या काजूबोंडांपासून वाईन निर्माण करण्याचा निर्णय विद्यापीठस्तरावर घेण्यात आला. उद्यान विद्या विभागप्रमुख डॉ. पराग हळदणकर यांनी हा प्रस्ताव मेहता यांच्याकडे मांडला. त्यांनी हिरवा कंदील दाखवताच हळदणकर, राजेंद्र आग्रे, गिरेश चव्हाण यांनी संशोधनाला सुरुवात केली. विद्यापीठाचा वाईनरी प्रकल्प प्रायोगिकतत्त्वावर सुरु झाला. काजूबोंडांपासून वाईन बनवण्याचा नाशिक येथील टेस्टिंग लॅबचे रिपोर्ट उत्कृ ष्ट आल्यानंतर करवंदापासून वाईन बनवून करंवदाला फळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले. हा प्रयोगही यशस्वी झाला. जांभूळ, कच्चा आंबा, पिका आंबा अशा फळांची वाईन बनविण्यात विद्यापीठाला यश आले. संयुक्त संशोधन समितीने या प्रकल्पाला मान्यताही दिली आहे. डॉ. सी. डी. पवार, डॉ. प्रभूदेसाई, एस. जी. कस्तुरे, जीवन कदम या शास्त्रज्ञांनी वाईनचा प्रयोग यशस्वी केला आहे. विस्तार संशोधन संचालक डॉ. उत्तमकुमार महाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरु आहे.
विद्यापीठाच्या वायनरी प्रकल्पाला शेतकरी उद्योजक यांनी भेट देऊन संशोधन समजून घेण्यासाठी विद्यापीठ स्तरावर प्रयत्न सुरु असले तरी गेल्या सात वर्षात एकही उद्योजक विद्यापीठाच्या वाईनचा प्रकल्प स्वीकारायला तयार नाही. ही वस्तुस्थिती आहे. शास्त्रज्ञांकडून यासंदर्भातील तांत्रिक माहिती पुरविली जाणार आहे. विद्यापीठाचे शास्त्रज्ञ फळप्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी म्हणून प्रयत्न करीत असले तरी शेतकरी व उद्योजक मात्र वायनरी प्रकल्पाबाबत उदासीन असल्याचे समोर येत आहे.
द्राक्षापासून वाईन त्याबरोबरच फळांपासून वाईन निर्मितीचा प्रयत्न केला जात असताना विद्यापीठ स्तरातील शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयत्नांना उद्योजकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यापीठाचा हा प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाही. (प्रतिनिधी)