काँग्रेसची मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार
By admin | Published: October 6, 2015 03:13 PM2015-10-06T15:13:51+5:302015-10-06T15:28:55+5:30
भाजपा विकास परिषदेत शहर विकासासाठी ६५०० कोटींचे पॅकेज जाहीर करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - भारतीय जनता पक्षाच्या विकास परिषदेत शहर विकासासाठी ६५०० कोटींचे पॅकेज जाहीर करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत सापडले असून त्यांच्याविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे.
गेल्या आठवड्यात कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक ( १ नोव्हेंबर) तारखा जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली मात्र तरीही शनिवारी डोंबिवलीत पार पडलेल्या भाजपच्या विकास परिषदेत मुख्यमंत्र्यांनी शहर विकासासाठी ५६०० कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. तसेच यापूर्वीही वगळलेल्या २७ गावांसाठी १२०० कोटींचे विशेष पॅकेज राज्य सरकारने जाहीर केले. मात्र मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला होता. निवडणूक आयोगानेही त्याची दखल घेत निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांना प्रलोभने दाखविता येणार नाहीत, असे स्पष्ट केले होते. आचारसंहितेचा भंग झाला का हे पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे विधान तपासून अहवाल मागवण्यात येईल असे निवडणूक आयोगातर्फे सांगण्यात आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आज काँग्रेसतर्फे निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.