कोल्हापूरात मराठा मोर्चासाठी आचारसंहिता जाहीर
By admin | Published: October 7, 2016 08:48 PM2016-10-07T20:48:28+5:302016-10-07T20:48:28+5:30
येथे १५ आॅक्टोबरला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा कशा पद्धतीने काढण्यात यावा, यासंबंधीची आचारसंहिताच शुक्रवारी सकल मराठा समाजाच्यावतीने जाहीर करण्यात आली.
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 07 - येथे १५ आॅक्टोबरला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा कशा पद्धतीने काढण्यात यावा, यासंबंधीची आचारसंहिताच शुक्रवारी सकल मराठा समाजाच्यावतीने जाहीर करण्यात आली. हा मोर्चा कोपर्डीतील बलात्काराच्या घटनेचा निषेध म्हणून काढण्यात येत असल्याने त्यातील गांभीर्य सर्वांनीच पाळावे, असे आवाहन करण्यात आले.
या मोर्चास अखेरचे आठ दिवस राहिले आहेत. मोर्चासाठी कोल्हापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यांतूनही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूरच्या मोर्चाकडे राज्याचे लक्ष आहे. त्यामुळे तितक्याच ताकदीने परंतु शिस्तबद्ध आणि गंभीरतेने हा मोर्चा निघावा, असा आग्रह धरण्यात आला. त्यासाठीच मराठा समाजबांधवांनी ही आचारसंहिता आजपासूनच कृतीत आणावी, असे आवाहन समाजातर्फे करण्यात आले.
आचारसंहिता अशी :
१)कोल्हापूरसह राज्यभरातील मोर्चे हे सकल मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली निघाले आहेत. सामान्य मराठा माणूस हाच त्याच्या केंद्रबिंदू राहिला आहे. त्यामुळे आजपासून मोर्चा निघेपर्यंत समाजातील कोणत्याच नेत्याचे नाव वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणार नाही. सर्व वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनाही तसे लेखी कळविण्यात येईल. जे काही संघटन, नियोजन असेल ते सकल मराठा म्हणून होईल.
२) कोल्हापुरातील मोर्चाचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात बसून आपण स्वीकारणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले आहे. मराठा समाजाच्या मागण्या काय आहेत हे सरकारला माहीत नाहीत असे नाही. त्यामुळे मोर्चाच्यावतीने प्रातिनिधीक स्वरूपातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाईल. तिथे कोणतीही चर्चा केली जाणार नाही.
३) मोर्चाच्या नियोजनासाठी काही लोक, त्यातही राजकीय नेते स्वत:हून मदत निधी देऊ लागले आहेत. निधी दिल्याच्या काही बातम्याही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्या आहेत. ह्या गोष्टी तातडीने बंद करण्यात आल्या आहेत. ज्यांना समाजाबद्दल बांधीलकी आहे, त्यांनी जरूर मदत करावी. त्याची रितसर पावती दिली जाईल परंतु त्याची कुठेही वृत्तपत्रांत बातमी दिली जाणार नाही. ज्यांनी मदत दिली त्यांनीही अशी बातमी परस्पर देवू नये.
४) मोर्चा एका संवेदनशील प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी काढण्यात येत आहे. त्यामुळे मोर्चाला येताना त्याचे स्वरूप उत्सवी होईल, असा पेहराव कुणीच करू नये. हा मोर्चा मूक असल्याने घोषणा देण्याचा प्रश्नच येणार नाही. मोर्चात एकच भगवा झेंडा सर्वत्र असेल. अन्य कोणताही झेंडा असणार नाही.
५)आता मोर्चाच्या नियोजनासाठी गावोगांवी फेऱ्या निघत आहेत. त्यामध्ये तरुण मुले मोटारसायकलच्या पुंगळ््या काढून जल्लोषी स्वरुपात फेऱ्या काढत आहेत. त्या तातडीने बंद केल्या जाव्यात. फेरी जरूर काढली जावी परंतु त्यातून आपल्याच लोकांना त्रास होऊ नये, याची दक्षता सर्वांनी घेतली जावी.
६) मोर्चाच्या तयारीसाठी जे डिजिटल फलक व प्रचाराचे साहित्य वापरले जात आहे, त्यावर कोणत्याही राजकीय नेत्याची छबी दिसता कामा नये. त्याने स्वत:हून छापून घेतलेल्या साहित्यावरही असा प्रचार करता येणार नाही. या फलकावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह आरक्षणाच्या धोरणाचे जनक म्हणून शाहू महाराज यांचेही छायाचित्र आवर्जून वापरले पाहिजे. या सर्व फलकांवर फक्त सकल मराठा समाज एवढाच उल्लेख असेल. त्यामध्ये अन्य कोणत्याही संस्था व संघटनांचे नांव असू नये.
७) मोर्चाला येताना किंवा मोर्चाहून परत जाताना सर्वांनीच शांतपणे जावे. वाहने पळविणे, अनावश्यक स्पर्धा करून अपघाताला निमंत्रण देणारे वर्तन होता कामा नये. कांही डिजीटल फलकांवर ह्यएकदाच दाखविणार..कायमचे वाकविणार...ह्णअशा अत्यंत प्रक्षोभक भाषेत घोषणा लिहिल्या आहेत. आपला मोर्चा कोणत्याच समाजाविरुध्द नाही. त्यामुळे इतर समाज दुखावेल अशा स्वरुपाच्या घोषणा फलकांवर लिहून मने कलुषित होणार नाहीत याची दक्षता घेतली जावी.