१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 01:40 PM2024-10-03T13:40:14+5:302024-10-03T13:41:13+5:30

अलीकडेच विधानसभा निवडणूक वेळेवर होण्याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले होते. 

Code of conduct in Maharashtra after October 13?; Election program likely to be announced | १३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता

१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. ८ ऑक्टोबरला हरियाणा, जम्मू काश्मीर निवडणुकीचे निकाल लागणार आहे. १० ऑक्टोबरला या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम संपेल. नियमानुसार एका निवडणुकीचा कार्यक्रम संपेपर्यंत दुसरी निवडणूक घोषित होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात १३ ऑक्टोबरनंतर विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होईल असं बोललं जाते. 

महाराष्ट्रात नवी विधानसभा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी अस्तित्वात यायला हवी. तत्पूर्वी निवडणुकीसाठी मतदान होऊन निकाल लागणे गरजेचे आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ४५ दिवसांनी नवीन विधानसभा गठीत करावी लागते. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान घ्यायचे ठरवले तर त्यासाठी ऑक्टोबरला १३ ते १६ या तारखांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करावी लागेल. त्यामुळे ४५ दिवसांनी राज्यात नवं सरकार येऊ शकते.

निवडणूक आयोगाने घेतला तयारीचा आढावा

काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाचे पथक दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी राज्यातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. आयोगाने तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची सूचना राज्य सरकारला केली होती. त्याची पूर्तता झाल्याचे प्रमाणपत्र राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना निवडणूक आयोगाला सादर करावे लागते. मात्र, या बदल्याच न झाल्याने आणि आयोगाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली. काही अधिकारी आपल्या गृहजिल्ह्यात तैनात आहेत. निवडणूक काळात अशा अधिकाऱ्यांची बदली ते रहिवासी असलेल्या जिल्ह्याच्या बाहेर करायची असते, त्याबाबतही आयोगाने केलेल्या सूचनांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याचे सांगत, या सर्व बदल्या करण्याचे निर्देश दिले आहेत, असे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले आहे.

२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल - निवडणूक आयोग

अलीकडेच विधानसभा निवडणूक वेळेवर होण्याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले. राज्य विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे, त्यापूर्वी निवडणूक होईल. विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्यावी, अशी मागणी शिंदे सेना आणि अजित पवार गटाने केली आहे. मात्र, निवडणूक किती टप्प्यात होईल, हे लवकरच सांगू, असे राजीव कुमार यांनी सांगितले.
 

Web Title: Code of conduct in Maharashtra after October 13?; Election program likely to be announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.