हिंदी चित्रपटात हवी स्व-संकल्पनांवरील संहिता

By admin | Published: March 10, 2017 06:09 AM2017-03-10T06:09:00+5:302017-03-10T06:09:00+5:30

हॉलीवूड व अन्य भाषांतील चित्रपटांचे डबिंग, रीमेक बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात केले जातात. त्याऐवजी, स्वत:च्या संकल्पना आणि संहितांवर आधारित चित्रपटांची निर्मिती

Code of the Self concepts in Hindi film | हिंदी चित्रपटात हवी स्व-संकल्पनांवरील संहिता

हिंदी चित्रपटात हवी स्व-संकल्पनांवरील संहिता

Next

मुंबई : हॉलीवूड व अन्य भाषांतील चित्रपटांचे डबिंग, रीमेक बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात केले जातात. त्याऐवजी, स्वत:च्या संकल्पना आणि संहितांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यावर भर देण्याची गरज आहे, त्यातून बॉलीवूडचे निर्यात उत्पन्न वाढू शकेल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केले.
मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील एका नव्या अध्यायाला गुरुवारी सुरुवात झाली. या कार्यक्रमात ‘बिग बी’ यांच्या हस्ते नव्या शिक्षण अभ्यासक्रमांचा शुभारंभ करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले की, या अभ्यासक्रमांमुळे कुशल मनुष्यबळ निर्माण करून मुंबईला मनोरंजनाच्या क्षेत्रातील वैश्विक नेतृत्वही प्रदान करण्याची क्षमता या माध्यमातून निर्माण होणार होईल.
ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी या क्षेत्रातील बारकाव्यांवर प्रकाश टाकला. रमेश सिप्पी अ‍ॅकॅडमी आॅफ सिनेमा अ‍ॅण्ड एंटरटेनमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक नवे दालन तयार होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई विद्यापीठाला १६० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे तर चित्रपट नगरीचा १०५ वर्षांचा समृद्ध प्रवास आहे. त्यामुळे या क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार करणारी अशी एखादी संस्था असावी या दृष्टिकोनातून या पर्वाला सुरुवात होत असल्याचे बिग अ‍ॅनिमेशन प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुलकर्णी यांनी सांगितले. तर गरवारे व्यवसाय आणि प्रशिक्षण संस्थेत हे पाच नवीन अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत असल्याचा आनंद असून या माध्यमातून राष्ट्राला अधिक चांगल्या गुणवत्तेचे कुशल मणुष्यबळ प्राप्त होणार असल्याचे संचालक डॉ. अनिल कर्णिक म्हणाले. (प्रतिनिधी)

‘त्या’ दृश्यासाठी तीन वर्षांचा अभ्यास
‘शोले’ चित्रपटात अभिनेत्री जया बच्चन कंदील घेऊन उभ्या असल्याचे एक दृश्य चित्रित करण्यात आले आहे. या दृश्यातील ठरावीक प्रकाशाची पातळी दिसण्यासाठी रमेश सिप्पी यांनी तब्बल तीन वर्षे अभ्यास केल्याचे अमिताभ बच्चन यांनी या वेळी सांगितले. सिप्पी यांच्या कामातील हेच ‘परफेक्शन’ भविष्यातील पिढी परिपूर्ण बनवेल, हा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्यासोबत शोले चित्रपटादरम्यान काम करतानाचे अनेक अनुभव उपस्थितांसमोर मांडले.

नवीन अभ्यासक्रमांचे स्वरूप
पदवीच्या पाच नवीन अभ्यासक्रमांमध्ये बॅचलर इन फिल्म आर्ट, बॅचलर इन फिल्म प्रोडक्शन, बॅचलर इन स्क्रिप्ट रायटिंग, बॅचलर इन व्हीएफएक्स आणि बॅचलर इन अ‍ॅनिमेशन या पाच नवीन अभ्यासक्रमांची सुरुवात शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ पासून होत आहे. ७५ टक्के प्रात्यक्षिक आणि २५ टक्के थिअरी असे या अभ्यासक्रमांचे स्वरूप असणार आहे. सहा सत्रांमध्ये हे पदवीचे पाचही अभ्यासक्रम आहेत. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमांना प्रविष्ट होणाऱ्या विशेष नैपुण्यप्राप्त एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.

Web Title: Code of the Self concepts in Hindi film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.