सीओईपीचा ‘स्वयम’ झेपावला
By Admin | Published: June 23, 2016 02:30 AM2016-06-23T02:30:33+5:302016-06-23T02:43:21+5:30
‘स्वयम’ हा लुघ उपग्रह श्रीहरीकोटा येथून सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी अवकाशात झेपावला आणि सीओईपीच्या विद्यार्थी व प्राध्यापकांनी जल्लोष केला.
पुणे : कॉलेज आॅफ इंजिनिअरिंंगच्या (सीओईपी) विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘स्वयम्’ हा लुघ उपग्रह श्रीहरीकोटा येथून सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी अवकाशात झेपावला आणि सीओईपीच्या विद्यार्थी व प्राध्यापकांनी जल्लोष केला. स्वयम्चे यशस्वीरीत्या लाँच झाल्याने सीओईपीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून पीएसएलव्हीसी - ३४ हा प्रक्षेपक स्वयम्सह एकूण २० उपग्रह घेऊन अवकाशात झेपावला. त्यात १८ उपग्रह हे विदेशी असून तमिळनाडू येथील सत्यभामा विद्यापीठातील काही प्राध्यापकांनी तयार केलेल्या एका उपग्रहाचाही समावेश आहे.
सीओईपीच्या १७० हून अधिक विद्यार्थ्यांनी गेल्या आठ वर्षांपासून हा उपग्रह तयार करण्यासाठी कष्ट घेतले. आठ
वर्षांपूर्वी सीओईपीच्या एका विद्यार्थ्याने तत्कालीन संचालक डॉ. अनिल
सहस्रबुद्धे यांच्यासमोर मांडलेली कल्पना साकार झाली. त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. आमच्या भावना शब्दात मांडता येत नसल्याचे अजिंक्य हिरे, विशाल देसाई, तनया कोलंकारी, तन्मय गाजरे, अपूर्व जोशी आदी विद्यार्थ्यांनी सांगितले. सीओईपीमध्ये उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाशी स्वयम्चा संपर्क पुढील १५ दिवसांत होईल, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आवाज कुणाच्चा? स्वयम्चा, सीओईपीचा...
श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून ‘स्वयम्’चे यशस्वी प्रक्षेपण झाले आणि कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी)मध्ये एकच जल्लोष झाला. विद्यार्थी व प्राध्यापकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या, गळाभेट घेऊन आनंद व्यक्त केला. तसेच आवाज कुणाच्चा? आवाज कुणाच्चा? सीओईपीचा... अशा घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा परिसर दणाणून सोडला.
स्वयम्च्या यशस्वी लाँचिंगमुळे सलग आठ वर्षे विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे चीज झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही वाढला आहे. सीओईपीचे संचालक बी. बी. आहुजा, प्रा. एम. वाय. खळदकर आणि सौरभ बर्वे, धवल वाघुळडे, अब्दुलहुसैन सोगरवाल हे विद्यार्थी श्रीहरीकोटा येथे स्वयम्च्या प्रक्षेपणास उपस्थित होते. सीओईपीच्या सभागृहात विद्यार्थी व प्राध्यापकांनी स्वयम्सह इतरही उपग्रहांचे प्रक्षेपण लाईव्ह पाहिले. याप्रसंगी सीओईपीचे उपसंचालक बी. एन. चौधरी, इस्रोतील निवृत्त शास्त्रज्ञ ए. के. सिन्हा, प्रा. एस. एल. पाटील, डॉ. संदीप मेश्राम यांच्यासह अनेक प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. स्वयम्च्या प्रकल्पात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.
शास्त्रज्ञ ए. के. सिन्हा म्हणाले, ‘‘उपग्रहाची निर्मिती करणे ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे सीओईपीच्या विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. ज्या विद्यार्थ्यांनी स्वयम्च्या निर्मितीमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांना पुढील काळात इस्रोमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. मात्र, त्यासाठी त्यांना फार कष्ट घ्यावे लागतील.’’ स्वयम्कडून स्वत:हून पाठविले जाणारे सिग्नल सध्या प्राप्त होत आहेत. त्यामुळे स्वयम् सध्या सुस्थितीत असून लवकरच तो अवकाशात स्थिरावेल. त्यानंतर १५ दिवसांनी खऱ्या अर्थाने स्वयम्शी कम्युनिकेशन करता येईल, असे सांगून विशाल देसाई हा विद्यार्थी म्हणाला, ‘‘सी-सॅट अर्थात स्वयम् प्रकल्पात काम करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला आहे. या प्रकल्पातील पुढील उपग्रहनिर्मितीसाठी विद्यार्थ्यांना फायदा होईल.’’
एखादे जहाज समुद्रात भरकटले असेल तर स्वयम्च्या माध्यमातून त्याला मदत करता येऊ शकते. संबंधित जहाजाने मदतीसाठी पाठविलेले सिग्नल हॅम ब्रॅडविर्थच्या माध्यमातून पाठविले असतील तर ते स्वयम्पर्यंत पोहोचू शकतील. त्याद्वारे संबंधित जहाजाशी संपर्क साधून जहाजातील व्यक्तींना मदत करता येईल. स्वयम्चा उपयोग कम्युनिकेशनसाठी करता येईल, असे विशाल देसाई या विद्यार्थ्याने सांगितले.
आमच्या आठ वर्षांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचा खूप आनंद होत आहे. पर्वती येथे उपग्रहाशी संबंधित एक टेस्ट घेण्यात आली होती. परंतु, उपग्रहाचे ग्राऊंड स्टेशन हे सीओईपीमध्येच असणार आहे. स्वयम्च्या यशानंतर आता आम्ही स्वयम्-2 च्या कामास सुरुवात केली आहे. - विशाल देसाई, विद्यार्थी
४४४
सीओईपीमधील विद्यार्थी सलग आठ वर्षे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो आनंदाचा क्षण आज आम्हाला दिसत आहे. स्वयम् अवकाशात यशस्वीरीत्या झेपावले. हे यश केवळ विद्यार्थ्यांचे नाही. आम्हाला सुरुवातीपासून प्रोत्साहन देणारे माजी संचालक डॉ. अनिल सहस्रबुद्धे आणि सध्याचे संचालक बी. बी. आहुजा आणि सर्व शिक्षकांनी पाठिंबा दिला, तसेच योग्य मार्गदर्शन केले. - तनया कोलंकारी, विद्यार्थिनी
४४४
उपग्रहाकडून येणारे सिग्नल सीओईपीतील ग्राऊंड स्टेशनला मिळतील. दोन ग्राऊंड स्टेशनमध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी या उपग्रहाचा उपयोग होणार आहे. आम्ही तयार केलेले जगभरातील अनेक ग्राऊंड स्टेशनला दिले आहे. मी व माझ्या सहकाऱ्यांनी उपग्रहाच्या पॉवर सिस्टिमवर काम केले.
- तन्मय गाजरे, विद्यार्थी
४४४
स्वयम् लाँच झाल्याचा आनंद शब्दामध्ये व्यक्त करता येण्यासारखा नाही. गेल्या काही वर्षांपासून आमच्या मनात धाकधूक होती. परंतु आमची सर्व टीम स्ट्राँग आहे. आम्ही सर्वांनी एकत्र मिळून टीमवर्क म्हणून काम केले. कामातून ब्रेकही सर्व एकत्र मिळून घेत होतो. त्यामुळे कामात कोणीही मागे राहत नव्हते. आता दुसऱ्या उपग्रहाच्या निर्मितीची तयारी सुरू आहे.
- अजिंक्य हिरे, विद्यार्थी
४४४
आम्ही सर्वांनी एकत्र मिळून तयार केलेला प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाला. त्यामुळे खूप आनंद झाला आहे. आमचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. त्यामुळे आम्ही जोमाने कामाला सुरुवात करणार आहोत.
- अपूर्व जोशी, विद्यार्थी
४४४
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) पीएसएलव्ही-३४ च्या माध्यमातून एकाचवेळी २० उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम प्रस्थापित केला. इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन . या मोहीमेत पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘स्वयंम‘चा सुद्धा सहभाग असल्यामुळे पुण्यासाठी ही एक कौतुकास्पद बाब आहे. या विद्यार्थ्यांचा, संस्थेचा, मार्गदर्शकांचा पुणे शहराला अभिमान आहे. अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी स्वयंम्च्या टीमचे अभिनंदन केले आहे.