कॉफी आणि बरंच काही...
By Admin | Published: March 19, 2017 01:02 AM2017-03-19T01:02:07+5:302017-03-19T01:02:07+5:30
मित्रांना खूप दिवसांनी भेटला आहात किंवा लग्नासाठी एखादं स्थळ ‘क्लीक’ झाल्यावर गप्पांसाठी भरपूर वेळ हवाच. हा वेळ घालवण्याचा पर्याय म्हणजे ‘कॉफी’शॉप.
- भक्ती सोमण
मित्रांना खूप दिवसांनी भेटला आहात किंवा लग्नासाठी एखादं स्थळ ‘क्लीक’ झाल्यावर गप्पांसाठी भरपूर वेळ हवाच. हा वेळ घालवण्याचा पर्याय म्हणजे ‘कॉफी’शॉप. कितीही वेळ आरामात गप्पा मारत पिता येते ती ‘कॉफी’च. त्यामुळे तिच्याविषयी
एक ममत्व वाटते.
आम्ही सर्व भावंडं एकत्र भेटलो की रात्री पत्ते खेळायचे आणि गप्पा मारायच्या हा आता अलिखित नियमच झाला आहे. मात्र रात्रीच्या मजेला चार चाँद लागतात ते कॉफीमुळे. मस्त कॉफी पीत त्यांच्यासोबत घालवलेला हा वेळ पुढे कितीतरी दिवस स्मरणात राहतो. अशी ही कॉफी ऋणानुबंध वाढवायला मदत करतेच करते, पण अवचित लगीनगाठीही तिच्यामुळेच जुळतात.
सकाळी उठल्यावर गरमागरम कॉफी घोटघोट पिताना तरतरी आणि उत्साह येतो. त्याच उत्साहात दिवस कसा जातो ते कळतही नाही, ज्याप्रमाणे चहा कितीहीवेळा हवाहवासा वाटतो तशीच ही कॉफीही. करायला अगदी सोपी आणि पटकन होणारी. अशी ही तरतरी आणणारी कॉफी मूळची आफ्रिकेतली आहे. इथिओपियाच्या दक्षिणेला काफा संस्थानात कॉफीची पहिल्यांदा लागवड झाली. पंधराव्या शतकात ती इथिओपियातून अरबस्तानात आली. भारतात कॉफी १६००च्या सुमारास आली. कावाह (Quhwah) या अरबी शब्दापासून ‘कॉफी’ शब्द रूढ झाला. त्याची ही कथा आहे. अरब राष्ट्रांमध्ये, अरबीमध्ये या पेयाला ‘काहवा’, ‘बियांची वाइन’ म्हटले जात असे. पुढे अरब देशांतून तुर्कस्तानात पोहोचल्यावर काहवाचे ‘काहवे’ असे नाव झाले. पुढे डचांनी काहवेचे नामकरण ‘कोफी’ असे (koffie) केले. इंग्रजांनी त्या कोफीचे ‘कॉफी’ (Coffee) असे नामकरण केले. तेच आज प्रचलित आहे.
कॉफी पिण्याचे आणि ते करण्याचे तर अनेक प्रकार आहेत. कॅफेनच्या बियांपासून तयार केलेली कॉफी अत्यंत कडू असल्याने ती पिणे अशक्यच असते. ती पिण्यास सुसह्य व्हावी यासाठी त्यात ‘चिकोरी’ नावाचे फळ मर्यादित प्रमाणात वापरतात. त्यापासून मग वेगवेगळ्या प्रकारची कॉफी तयार होते. आपल्या घरात इन्स्टंट कॉफी, उकळायची कॉफी, बिनदुधाची कॉफी, जायफळ घातलेली कॉफी तर सर्रास होतेच. पण मित्र-मैत्रिणींमुळे इराणी कॉफी, मद्र्रासी कॉफीचीही चटक आपल्याला लागते. तसेच सध्या परदेशातले कॅप्युचिनो, मोचा, मॅक्सिकन, हवाईयन असे काही प्रकार आवडू लाागले आहे. पण, परदेशातल्या काही कॉफीच्या प्रकारांनी आपले वैशिष्ट्य मात्र छानपैकी जपले आहे. या कॉफींमध्ये टर्कीश कॉफीचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. प्रामुख्याने जेवणानंतर ही कॉफी दूध, साखर न घालता अगदी छोट्या कपात दिली जाते. ती पिण्यात एक वेगळीच शान असल्याचे लोक मानतात. तर Kopi luwak ही अत्यंत महागडी कॉफी म्हणून ओळखली जाते. ही कॉफी करण्याची एक गंमत आहे. सिवेट (civet) नावाच्या मांजराला कॉफीची फळे खायला घालतात. ती फळे खाऊन झाल्यावर त्याच्या बिया मांजर बाहेर काढते. त्या बियांवर विशिष्ट प्रक्रिया करून ही कॉफी तयार होते. आता तर ही कॉफी भारतातपण काही ठिकाणी मिळते.
मात्र कॉफीमध्ये कॅफेनचे प्रमाण इतर पदार्थांच्या तुलनेत खूप जास्त असते. एक कप कॉफीत ते १२० ते २०० मिलीग्रॅम असते. त्यामुळे जास्त कॉफी प्यायल्यास त्याचे शरीरावर अनेक परिणाम दिसतात. त्यामुळे मर्यादीत प्रमाणातच कॉफी प्यावी. शेवटी काहीही असले तरी कॉफी पिण्याची मजा ही वेगळीच. कारण ती कडू असली तरी आयुष्यात मात्र गोडवाच आणते. त्यामुळे ती आणखी जीवाभावाची वाटते. हो ना!