कॉफीचे आयुष्य आता फक्त ६४ वर्षे ?

By admin | Published: October 3, 2016 08:08 AM2016-10-03T08:08:25+5:302016-10-03T08:08:25+5:30

ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणाऱ्या वातावरणीय बदलांमुळे कॉफीचे अस्तित्व धोक्यात आल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे

Coffee life now only 64 years? | कॉफीचे आयुष्य आता फक्त ६४ वर्षे ?

कॉफीचे आयुष्य आता फक्त ६४ वर्षे ?

Next
>पूजा दामले / ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - कॉफी... हा नुसता शब्द ऐकला तरी ताजेतवाने व्हायला होते. कॉफीच्या दरवळणाऱ्या वासावरुन अनेकांच्या जुन्या आठवणी ताज्या होतात. परदेशातून आलेली कॉफी कधी घरची आणि भारतीय झाली हे कोणालाच कळले नाही. पण, हीच कॉफी पुढच्या ६४ वर्षांत इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. अमेरिकेत झालेल्या संशोधनातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. कॉफीच्या पिकासाठी एका विशिष्ट प्रकारचे तापमान आणि हवामान आवश्यक असते. पण, ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणाऱ्या वातावरणीय बदलांमुळे कॉफीचे अस्तित्व धोक्यात आल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. हा परिणाम, परदेशातीलच नाही तर भारतीय कॉफीवरही होताना दिसून येतो आहे. 
 
‘अ‍ॅरेबिका’ आणि ‘रोबस्टा’ हे कॉफीच्या दोन्ही  प्रकारांना जगभरातून पसंती मिळते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे प्रामुख्याने याच प्रकारांवर परिणाम होत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. वाढते तापमान, अनियमित पाऊस, सतत होणाऱ्या  वातावरणीय बदलांचा थेट परिणाम कॉफीच्या पिकांवर होताना दिसत आहे. जगभरात होत असलेले परिणाम भारतामध्येही दिसून आले आहेत. २००२ ते २०११ या १० वर्षांच्या कालावधीत भारतात होणाऱ्या कॉफीच्या पिकांमध्ये ३० टक्क्यांनी घट झाली आहे.
 
गेल्या काही वर्षांपासून मानवालाही वाढणारे तापमान सहन होत नाही. मानवी गुणधर्मामुळे मानव बदलत्या निसर्गाशी जुळवून घेतो आहे. पण, बदलत्या निसर्गाशी जमवून घेणे झाडाझुडपांना, पिकांना शक्य नाही. ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणाऱ्या वातावरणातील बदलांचा परिणाम सर्वच पिकांवर कमी अधिक प्रमाणात दिसून येत आहे. पण, वातावरणातील हे बदल होत राहिल्यास अथवा वाढल्यास कॉफीच्या पिकाच्या जमिनीची गुणवत्ता कमी होत जाणार आहे. त्यानंतरी या ग्लोबल वॉर्मिंगला मानवाने आळा घातला नाही. तर, पुढे जाऊन २०८० पर्यंत कॉफीचे पिक येणेच बंद होईल, असे शास्त्रज्ञांनी सर्वेक्षणात नमूद केले आहे. 
 
हा भविष्यकाळ आहे, कॉफी नष्ट कशी होईल, असा याक्षणी विचार करणे अत्यंत चुकीचे ठरेल. कारण, ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आताही कॉफीच्या पिकावर दिसायला लागले आहे. सतत वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे कॉफीच्या उत्पादनात घट झालीच आहे. तर, वाढत्या तापमानामुळे कॉफीचा फ्लेवर आणि वास कमी व्हायला लागला आहे. परिणामी कॉफीचा दर्जा कमी होता चालला आहे. त्यामुळे आता ही परिस्थिती असल्यास नक्कीच पुढच्या ६४ वर्षांत कॉफी नामशेष होऊ शकते. याचा आत्ताच गांभीर्याने विचार व्हायला हवा. 
 
कॉफीचा शोध लागला कसा?
कॉफी शॉपमध्ये आता कॉफीचे विविध प्रकार मिळतात. पण या कॉफीचा शोध इसोपियामध्ये लागला आहे. काही मेंढपाळ आपल्या मेंढा- शेळ्यांना घेऊन चरायला जात असत. काही दिवसांनी मेंढपाळच्या लक्षात आले की एका विशिष्ट भागातील फळांच्या बिया खाल्यावर मेंढे - शेळ्या उत्साहित दिसतात. त्यामुळे हे नक्की काय आणि कोणत्या बीया आहेत पाहण्यासाठी मेंढपाळ तिथे गेले, त्यावेळी त्यांना कॉफीचा शोध लागला.
 
भारतात कसा झाला कॉफीचा जन्म?
१६७० साली बाबा बुदान यांनी सर्वप्रथम कॉफीला भारतात आणले. १७ व्या शतकात बाबा बुदान हे आत्ताच्या कर्नाटकच्या चिकमंगळुरु जिल्ह्यात राहात होते. बाबा हे मक्काच्या यात्रेला गेले होते. परताना येमेनमध्ये त्यांनी एक वेगळचे पेय प्यायले, ते म्हणजे ‘कॉफी’. त्यांनी हे पेय प्यायल्यावर त्यांना उत्साहित वाटले. त्यावेळी त्यांनी कॉफीला भारतात आणायचे ठरवले. त्याकाळात अरबमधून कॉफीच्या बिया बाहेर नेण्यास मनाई होती. फक्त भाजलेल्या बिया बाहेर नेता यायच्या. त्यावेळी बाबांनी तिथून सात बिया लपवून भारतात आणल्या. त्या बिया त्यांनी चिकमंगळुरुच्या डोंगरावर पेरल्या. आता तो डोंगर बदाऊन नावाने ओळखला जातो.   
 
परिणाम कोणावर होणार?
वातावरणात याच वेगाने बदल होत राहिल्यास कॉफीच्या उत्पदनात घट होणार आहे. कॉफीचे उत्पादन घटल्यामुळे याचा त्रास कॉफी प्रेमींना तर होणारच आहे. पण, जगातील १२० दशलक्ष लोकांवर होणार आहे. कारण, जगातील इतके लोक हे कॉफीच्या व्यवसायवरच स्वत:चा  उदरनिर्वाह करीत आहेत. कॉफीची महत्त्वाची २ पिके नष्ट झाल्यास त्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होणार आहे. 
 
भारतात कॉफीचे पिक कोणत्या भागात घेतले जाते? 
भारतातील कॉफीचे पिक घेणाऱ्या भागांचे तीन प्रकारांमध्ये विभाजन केले जाते. 
पारंपरिक पद्धतीने कॉफीचे पिक घेतली जाणारी ठिकाणे : कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू
पारंपरिक पद्धतीने कॉफीचे पिक न घेतली जाणारी ठिकाणे : आंध्रप्रदेश, ओडिसा आणि अरुणाचल प्रदेश 
उत्तरपूर्व भारतात घेतले जाणारे कॉफीचे पिक : आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश 
एका कॉफीच्या झाडाला साधारणत: २ ते ४ किलो चेरीज येतात. 
कॉफीच्या चेरी तोडणारा कुशल कारागिर एका दिवसात ४५ ते ९० किलो कॉफीच्या चेरी काढू शकतो. या तोडलेल्या चेरींपासून ९ ते १८ किलो कॉफीच्या बिया मिळतात. 
 
भारतासह परदेशात अनेकांना कॉफी आवडते. कॉफी पिणाºयांचे प्रमाण अधिक आहे. पण, या कॉफीचे व्यसन लागणे हा एक वेगळा प्रकार आहे. सकाळी उठल्यावर अर्ध्या तासात कॉफी घेतली नाही, तर काहीजणांचे हात-पाय थरथरायला लागतात. त्यांना उत्साह वाटत नाही, काहीवेळी त्यांची चिडचिड होते. अशी स्थिती होत असल्यास काहीच दिवसांपूर्वी अमेरिकन सायक्रॅटी असोसिएशनने याला ‘कॅफिन यूज डिसॉर्डर’ असे नाव दिले आहे. कॅफिनमुळे मानवी मेंदूला चालना मिळते. मरगळ नाहीशी होते. त्यामुळे कॉफी प्यायल्यावर ताजेतवाने झाल्यासारखे वाटते. कॅफिनमुळे असे होत असले तरी अतिरेक वाईट असतो. नैसर्गिकरित्या सकाळी उठल्यावर ताजेतवाने न वाटता, कॉफी प्यायल्यावरच असे वाटल्यास त्याला डिसॉर्डर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दिवसातून १ ते २ कप कॉफी पिणे याला व्यसन म्हणू शकत नाही. 
- डॉ. सागर मुंदडा, मानसोपचारतज्ज्ञ 
 
कॉफीच्या पिकासाठी २३ ते २८ अंश सेल्सियस तापमान आणि वर्षभरात १ हजार ५०० ते २ हजार मिलीमीटर पावसाची आवश्यकता असते. अशा उबदार वातावरणात कॉफीचे चांगले पीक येते. त्याचबरोबरीने २ ते ३ महिन्यांसाठी कोरडे हवामान लागते. वातावरण स्वच्छ असताना कॉफीच्या पिकाची लागवड केली जाते. लागवड केल्यानंतर तीन ते चार वर्षांनी कॉफीला फळे यायला सुरुवात होते. तोपर्यंत झाडाची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. भारतात दोन प्रकारच्या कॉफीची पिके घेतली जातात. अ‍ॅराबिका आणि रोबुस्टा हे मुख्य दोन्ही प्रकार भारतात पिकतात. या दोन्ही प्रकारांचे अनेक उपप्रकार आहेत. 
-विशाल रसाळ, शास्त्रज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी  
 

Web Title: Coffee life now only 64 years?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.