पुन्हा थंडी; दोन दिवसांत किमान तापमान आणखी घसरणार, महाबळेश्वर@१३.५
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 04:44 AM2020-01-29T04:44:58+5:302020-01-29T04:45:01+5:30
पुढील दोन दिवसांत मुंबईच्या किमान तापमानात आणखी घसरण होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मुंबई : मुंबईच्या उपनगरात काही ठिकाणी मंगळवारी किमान तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात आले असून, पहाटे वाहणारे थंड वारे मुंबईकरांची सकाळ गारेगार करत आहेत. पुढील दोन दिवसांत मुंबईच्या किमान तापमानात आणखी घसरण होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, राज्यात मंगळवारी सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १३.५ अंश सेल्सिअस होते, तर मुंबईचे किमान तापमान १९.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाची नोंद १५ अंशाखाली झाली आहे. समुद्र किनारी वसलेल्या शहरांचे किमान तापमान १८ ते २० अंश सेल्सिअस होते. पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या किमान तापमानातही आणखी घसरण होईल.
मुंबापुरीतही वाहू लागले गार वारे
मुंबईत २६ जानेवारीनंतर थंडीचे पुनरागमन झाले आहे. २७ जानेवारी रोजी मुंबईच्या उपनगरात ठिकठिकाणी रात्रीच्या सुमारास गार वारे वाहत होते. मंगळवारी पहाटेदेखील वातावरणात गारवा होता. शहराच्या तुलनेत उपनगरात हवामान अधिक थंड असल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे.
असा आहे अंदाज
२९ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान राज्यात हवामान कोरडे राहील. २९, ३० जानेवारीला मुंबईसह आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. मुंबईच्या किमान तापमानात आणखी घसरण होईल, असा अदांज हवामान खात्याने व्यक्त केला.