राज्यात ऋतूंची मिसळ : अहमदनगरमधे थंडावा, सोलापूरात ऊन तर विदर्भ-मराठवाड्यात पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 02:41 PM2019-03-09T14:41:01+5:302019-03-09T14:42:59+5:30
राज्यात विविध ठिकाणी ऊन, पाऊस आणि थंडीचा खेळ अनुभवसाय मिळत आहे. काही ठिकाणच्या किमान तापमानाच्या पाऱ्यात घट झाली आहे. काही भागातील पारा पस्तीशी पार गेला आहे.
पुणे : राज्यात विविध ठिकाणी ऊन, पाऊस आणि थंडीचा खेळ अनुभवसाय मिळत आहे. काही ठिकाणच्या किमान तापमानाच्या पाऱ्यात घट झाली आहे. काही भागातील पारा पस्तीशी पार गेला आहे. तर, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पुढील तीन दिवस तुरळक पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
उन्हाळा सुरु झाला असे वाटत असतानाच मध्ये काही दिवस पहाटे आणि रात्री चांगला गारवा निर्माण झाला होता. त्यानंतर पुन्हा काही ठिकाणचा कमाल पारा पस्तीशी पार आणि काही भागात तर कमाल पाऱ्याने ३९च्या पुढे मजल मारली होती. मध्यमहाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट नोंदविण्यात आली. तसेच मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणचा किमान तापमानाचा पाऱ्यात कमालीची घट झाली. रविवारी (दि. १०) मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील. तर, सोमवारी आणि मंगळवारी मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाची हजेरी राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
मध्यमहाराष्ट्रात अहमदनगर, जळगाव, महाबळेश्वर, सांगली आणि सोलापूरच्या किमान तापमानात लक्षणीय घट झाली. अहमदनगरला राज्यात नीचांकी १२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सोलापूरचा किमान तापमानाचा पारा १६.५ अंशावर, तर कमाल तापमानाचा पारा ३७.५ अंशावर होता. जळगावला किमान तापमान १३.६ आणि कमाल तापमान ३५.६ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले. महाबळेश्वरला किमान तापमान १५.५ अंश आणि कमाल तापमान ३१.६ अंश सेल्सिअस होते. पुण्यामध्ये किमान तापमान १४.८ आणि कमाल तापमान २६.२, तर लोहगावला किमान तापमान १७.१ आणि कमाल तापमान ३६.१ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले. मालेगावला राज्यातील सार्वधिक ३७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मराठवाड्यातीत किमान तापमानाचा पारा १४ ते १६ अंश सेल्सिअस दरम्यान होता. औरंगाबाद येथे कमाल तापमान ३४.५, परभणी ३६.६, नांदेड ३४.५ आणि बीडला ३६.८ अंश सेल्सिअस होते. विदर्भातील किमान तापमानाचा पारा १.९ ते ४.३ अंश सेल्सिअसने घसरला. विदर्भात ब्रम्हपुरी येथे सर्वात जास्त ३७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले. तर, किमान तापमानाचा पारा गोंदिया येथे १३.४ अंश सेल्सिअस इतका नीचांकी होता. बुलडाणा (३३.२) वगळता विदर्भात कमाल तापमानाचा पारा पस्तीशी पार गेला होता.