राज्यातील तापमानात घट; गारठा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:10 PM2017-11-12T23:10:45+5:302017-11-13T00:19:35+5:30
पुणे : विदर्भाच्या संपूर्ण भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे़ राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ११.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते़.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे/मुंबई : दिवाळीपर्यंत लांबलेल्या परतीच्या पावसामुळे शेतशिवारात ओल कायम असून वाहत्या नद्यांमुळे यंदा नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यापासूनच गारठा वाढण्यास सुरूवात झाली आहे. भल्या सकाळी ग्रामीण भागामध्ये धुके पडण्यास सुरूवात झाली असून हवेतील गारवाही वाढला आहे. नाशिकला रविवारी पारा १0.४ अंशांपर्यंत घसरला.
नाशिकला सर्वात कमी १0.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. गेल्यावर्षी १२ नोव्हेंबरला नाशिकचे किमान तापमान ९.६ अंश होते. पुण्यातही रविवारी सकाळी हंगामातील सर्वात कमी किमान ११.५ अंश सेल्सिअस तापमान होते. मुंबईत दोन-तीन दिवसांत किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस आहे. आठवड्याभरापूर्वी ते २६ अंशाच्या आसपास होते. मुंबईत सकाळी व रात्री हवेत गारवा जाणवत आहे. १५ व १६ नाव्हेंबरला विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
- नाशिक जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. पारा सातत्याने घसरत असल्याने ग्रामीण भागात अधिक थंडी जाणवत आहे. सकाळी-सकाळी कामासाठी निघालेल्यांना थंडीपासून बचाव करण्यासाठी अशी सज्जता करावी लागत आहे.
- मुंबईच्या किमान तापमानातही काही प्रमाणात घट झाली आहे. आता जास्त घट अपेक्षित नाही. राज्याच्या उर्वरीत भागां त किमान तापमान सरासरीच्या जवळपास आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
- विदर्भाच्या संपूर्ण भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तापमानात मोठी घट झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात व मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.
- थंडी शेतीला पोषक : ही थंडी शेतीला पोषक आहे. गहू पिकाला हे हवामान चांगले आहे. द्राक्ष, केळी बागायतदारांना िपकांची काळजी घ्यावी लागणार आहे. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेतकर्यांनी पिकांची निगा राखणे गरजेचे आहे.