राज्यात थंडीचा जोर वाढला; विदर्भ गारठले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 09:56 PM2020-11-09T21:56:37+5:302020-11-09T22:10:34+5:30
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पारा घसरला
पुणे : राज्यात आता थंडीचा जोर वाढू लागला असून विदर्भात थंडीची लाट असल्याचे दिसून येत आहे. राज्यात सलग ५ दिवस सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर येथे नोंदविले जात आहे. सोमवारी सकाळी चंद्रपूर येथे किमान तापमान ८.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ते सरासरीच्या तुलनेत तब्बल ८.८ अंश सेल्सिअसने कमी आहे. विदर्भातील बहुतांश भागात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात किमान तापमानात घट होत असल्याचे दिसून येत आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
चंद्रपूर येथे गुरुवारी १२.४ अंश, शनिवारी ११.७ अंश, रविवारी १० अंश आणि आज सोमवारी ८.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे विदर्भातील अनेक ठिकाणच्या तापमानात सातत्याने घट होत आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)
पुणे १३.६, लोहगाव १५.१, जळगाव १२.६, कोल्हापूर १८.४, महाबळेश्वर १४, मालेगाव १३.८, नाशिक १२.५, सांगली १६.९, सातारा १५.७, सोलापूर १४.२, मुंबई २४.५, सांताक्रुझ २१.२, अलिबाग २०.७, रत्नागिरी २३.७, पणजी २४.५, डहाणु २१.३, औरंगाबाद १३.२, परभणी १०.३, नांदेड १४, अकोला १३.१, अमरावती १२.८, बुलढाणा १४.५, ब्रम्हपुरी १४.२, चंद्रपूर ८.६, गोंदिया ११, नागपूर १२.५, वाशिम १३, वर्धा १३.६.