राज्यात थंडीचा जोर कमी; गोंदियात सर्वात कमी तापमान
By admin | Published: January 7, 2016 02:31 AM2016-01-07T02:31:05+5:302016-01-07T02:31:05+5:30
मागील दोन दिवसांपासून मध्य महाराष्ट्र व कोकणात वाढलेली थंडी बुधवारी काही प्रमाणात कमी झाली, तर विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमानात सरासरीपेक्षा घट नोंदवली गेली आहे
पुणे : मागील दोन दिवसांपासून मध्य महाराष्ट्र व कोकणात वाढलेली थंडी बुधवारी काही प्रमाणात कमी झाली, तर विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमानात सरासरीपेक्षा घट नोंदवली गेली आहे. गोंदिया येथे सर्वात कमी तापमान १०.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. रविवारपर्यंत राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
नववर्षाच्या आगमनासह राज्यात पुन्हा थंडीचा जोर वाढू लागला होता. मात्र बुधवारी मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. मात्र विदर्भात तापमान घटले आहे. त्यामुळे विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे. गोंदिया येथे किमान तापमानात २ अंशांनी घट झाली आहे. तसेच नागपूर, अकोला, वर्धा येथेही थंडी वाढली आहे.
त्याचबरोबर जळगाव येथेही तापमानात दीड अंशांनी घट होऊन १०.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे पुणे येथे ११.३, अहमदनगर येथे १२. २, कोल्हापूर येथे १६.६, महाबळेश्वर येथे १४.९, मालेगाव येथे १३.४, नाशिक १०.७, सांगली १४.४, सातारा येथे १३, सोलापूर येथे १८.६, अलिबाग येथे १९.८, रत्नागिरी १८.२, उस्मानाबाद १३.९, औरंगाबाद १४.१, नांदेड १२, अकोला १२.७, अमरावती १४.४, बुलढाणा १६.५, चंद्रपूर १४, नागपूर ११.२, यवतमाळ येथे १६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.