चक्रीवादळामुळे थंडीचा कडाका अद्याप दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 07:59 PM2019-11-07T19:59:41+5:302019-11-07T20:00:41+5:30
आणखी दोन दिवस पाहावी लागणार वाट..
पुणे : दिवाळीमध्ये थंड वातावरणात अभ्यंग स्नानाचा अनुभव घेऊन देवदर्शनाला जाण्याची आपल्याकडे पुर्वापार पद्धत आहे़. यंदा मात्र भर दिवाळीत पाऊस अनुभवण्याची वेळ आली होती़. त्यानंतर अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याने त्याचा परिणाम होऊन दररोज न चुकता पाऊस हजेरी लावून जात आहे़. वाढती आर्द्रता आणि समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यांचा जोर यामुळ उत्तरेकडील वाऱ्यांना रोखले गेल्याने नोव्हेंबरचे काही दिवस सरले तरी राज्यात थंडीचा कडाका अनुभवायला मिळत नाही़. थंडीचा कडाका अनुभवण्यासाठी आणखी किमान दोन दिवस वाट पहावी लागणार आहे़.
यंदा पावसाळा लांबल्यामुळे ऑक्टोबर हिटचा फटका बसला नाही़. ऑक्टोबरमध्ये जवळपास २० दिवस पावसाळी होते़. त्यामुळे उन्हाचा त्रास झाला नाही़. त्यात दिवाळीच्या सुमारास अगोदर ‘क्यार’ हे महाचक्रीवादळ आले होते़. त्यानंतर आता ‘महा’ हे अति तीव्र चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण झाले़. त्याचा परिणाम आपल्याकडे पाऊस होत राहिल्याने तापमान अधिक राहिले़. अरबी समुद्रावरुन येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा जोर असल्याने उत्तरेकडील वाºयांना अडथळा निर्माण झाला होता़. त्यामुळे नोव्हेंबर उजाडला तरी तापमान वाढते राहिल्याने थंडी जाणवत नव्हती़.
मध्य महाराष्ट्राच्या काही भागता किमान तापमान सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे़. कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे़. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील जवळपास सर्व ठिकाणचे कमाल व किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहिल्याने थंडी अद्याप पडलेली दिसून येत नाही़.
पुणे शहरात नोव्हेंबर महिन्यात सरासरी कमाल तापमान ३०.५ अंश सेल्सिअस तर सरासरी किमान तापमान १४.७ अंश सेल्सिअस असते़. मात्र, गेले काही दिवस दिवसाचे तापमान कायम अधिक रहात आले आहे़ तर रात्रीचे तापमानात सरासरीच्या तुलनेत कायम ४ ते ५ अंश सेल्सिअसने अधिक राहिले आहे़. बुधवारी सकाळी ते २१ अंश सेल्सिअस होते़. त्यात घट होऊन गुरुवारी सकाळी पुणे शहरात किमान तापमान १९़३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़ ते सरासरीच्या तुलनेत तब्बल ४़७ अंश सेल्सिअसने अधिक आहे़. त्यामुळे अजून शहरात थंडीचा कडाका जाणवू लागलेला नाही़.
अरबी समुद्रात निर्माण झालेले महा चक्रीवादळ गुरुवारी गुजरातच्या किनारपट्टीला धडकल्यानंतरही त्याचा परिणाम पुढील १२ तास जाणवणार आहे़. त्यानंतर अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांचा जोर कमी होण्याची शक्यता आहे़.
काश्मीरमध्ये बुधवारपासून बर्फवृष्टी होण्यास सुरुवात झाली़. तसेच हिमाचल प्रदेशातही अनेक ठिकाणी बर्फवृष्टी होऊ लागली आहे़. त्यामुळे भारताचा उत्तर भागात थंडी सुरु झाली आहे़. अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव कमी होऊन उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर येत्या दोन दिवसात वाढण्याची शक्यता आहे़. त्यामुळे दोन दिवसानंतर राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे़.