सामान्यांचे थंड पाणी झाले महाग

By admin | Published: March 3, 2017 12:56 AM2017-03-03T00:56:35+5:302017-03-03T00:56:35+5:30

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यानंतरच सूर्य आग ओकू लागला आहे.

Cold water was expensive | सामान्यांचे थंड पाणी झाले महाग

सामान्यांचे थंड पाणी झाले महाग

Next


हडपसर : फेब्रुवारी महिन्याच्या मध्यानंतरच सूर्य आग ओकू लागला आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागल्यामुळे तापमानात वाढ होत आहे. थंड पाण्यासाठी फ्रीज आणि माठांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. गल्लीबोळात आणि रस्तोरस्ती माठ विक्री करणारे दिसू लागले आहेत. माठांच्या किमती वाढल्याने सामान्यांचे थंड पाणीही महाग झाले आहे, अशी भावना मजूरवर्गातून व्यक्त केली जात आहे.
आता माठ गरिबांचा नाही, तर उच्चवर्गाचाही फ्रिज ठरू लागला आहे. शहर परिसरातील कुंभारवाड्यात होणारे माठाचे उत्पादन बंद झाले आहे. त्यामुळे बाहेरगावाहून आलेले माठांची विक्री रस्तोरस्ती, गल्लोगल्लीत विक्री केली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
फेब्रुवारी महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. दिवसेंदिवस वाढत्या उन्हामुळे माठांना मागणी वाढली आहे. एकेकाळी कुंभारवाड्यात जाऊन माठ खरेदी करावे लागत होते. महागाईने कळस गाठला असल्यामुळे गरिबांच्या फ्रिजच्या किमतीमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. रोजंदारीवर काम करून जीवन जगणाऱ्या मजूरवर्गाला तुलनेने हजेरी कमी मिळत आहे.
गुजरात, राजस्थान आणि पंढरपूर, बार्शी, लातूर, सोलापूर या ठिकाणांहून माठ आणून पुणे शहर आणि परिसरामध्ये त्याची विक्री केली जात आहे. माठ विक्रेते हातगाडीवरून मुख्य रस्ता तसेच गल्लीबोळामध्ये जाऊन माठ विक्री करू लागले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत माठांच्या किमतीमध्ये वाढ झाली असली, तरी खरेदीदारांची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र मुंढवा, केशवनगर, घोरपडी, मगरपट्टा, रामटेकडी, वैदूवाडी, हडपसर, ससाणेनगर, शेवाळेवाडी, फुरसुंगी, मांजरी, उपनगर आणि परिसरामध्ये दिसत आहे.(वार्ताहर)
>माठाच्या किमती गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. काळा माठ गेल्या वर्षी १०० रुपये होता, तो १२० रुपये, तर लाल माठ १७० रुपयांवरून २०० रुपये झाला आहे. तसेच तोटी बसविलेला काळा माठ १८० वरून २०० रुपयांवर, तर तोटीचा लाल माठ २०० वरून २५० रुपये झाला आहे. रंगरंगोटी आणि नक्षीकाम केलेल्या माठांना मागणी वाढली आहे.

Web Title: Cold water was expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.