राज्यात आली शीतलहर; मुंबईतही थंडीने केला कहर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 11:52 AM2018-12-27T11:52:26+5:302018-12-27T12:04:06+5:30
उत्तर भारत थंडीने गारठला असतानाच महाराष्ट्रातही ठिकठिकाणी आजवरच्या कमी तापमानाची नोंद झाली आहे.
मुंबई : उत्तर भारत थंडीने गारठला असतानाच महाराष्ट्रातही ठिकठिकाणी आजवरच्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान नाशिकमधील निफाड तालुक्यात नोंदविण्यात आले आहे. निफाडमध्ये 1.8 अंश किमान तापमानाची नोंद झाली. तर मुंबईमध्ये काही स्थानकांवर 10 डिग्रीच्या आसपास तापमान होते.
मुंबईमध्ये आज सकाळी या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. काही रेल्वे स्थानकांवर 15 डिग्री पेक्षाही कमी तापमान होते. सांताक्रुझ स्थानकावर 12.4 डिग्री तापमानाची नोंद झाली. हे तापमान किमान सरासरी तापमानाच्या 5 अंशांनी कमी होते. गोरेगाव स्थानकावर 10 डिग्री तर पनवेलमध्ये 10.5 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. पनवेलमध्ये रात्रीपासूनच थंड हवा सुटली होती. बोरिवली, पवई येथेही कमी तापमाना होते.
राज्यभरातही तापमानाने किमान पातळी गाठली असून नाशिकमध्ये किमान तापमानाचा पारा 5.7 अंशावर आला होता. तर निफाडमध्ये 1.8 अंश किमान तापमानाची नोंद झाली.