राज्यभरात थंडीची लाट
By admin | Published: March 12, 2017 12:55 PM2017-03-12T12:55:59+5:302017-03-12T12:55:59+5:30
उत्तरेकडील राज्यात पडत असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम राज्यातील तापमानावर झाला असून, अनेक ठिकाणच्या किमान तापमानात मोठी घट झाली
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 12 - उत्तरेकडील राज्यात पडत असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम राज्यातील तापमानावर झाला असून, अनेक ठिकाणच्या किमान तापमानात मोठी घट झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. उत्तरेकडे पर्वतीय भागात पुन्हा बर्फवृष्टी झाल्याने आणि मैदानी प्रदेशात पाऊस बरसल्याने राज्याच्या अनेक भागांमध्ये पारा खाली घसरला आहे. थंड वाऱ्यांचा जोर वाढल्याने राज्यातील कमाल व किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे.
महाबळेश्वर येथील किमान 9 अंश, पुणे 10.3 अंश, नाशिक 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मालेगाव येथे किमान तापमान 12.2, जळगाव 13.6, अमरावती 12.4, सांगली 13.5, अकोला 16, नागपूर 17.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेले काही दिवस शहरासह राज्यातील बहुतांश ठिकाणचे किमान तापमान घटले आहे. विदर्भातील काही ठिकाणी तीव्र थंडीची लाट पसरली आहे.
(थंडीची लाट, उद्योगनगरी गारठली)
विदर्भातील ही थंडीची लाट कायम आली असून, काही ठिकाणी तीव्र थंडी पडेल, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागातदेखील सरासरीच्या तुलनेत तापमानात घट झाली असून, उर्वरित राज्यातील किमान तापमानही सरासरीइतकेच आहे. थंडीची लाट असल्याने नागरिकांनी गरम कपडे घालणे पसंत केले आहे. ग्रामीण भागासह, शहरातही ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. अंगात गरम कपडे नसले तर अंगात लगेच हुडहुडी भरते आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.