राज्यात थंडीची लाट कायम
By admin | Published: December 26, 2015 01:43 AM2015-12-26T01:43:57+5:302015-12-26T01:43:57+5:30
राज्यातील थंडीचा कडाका वाढत असून नाशिकमध्ये हंगामातील निचांकी ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये तापमानात सरासरीपेक्षा ४.६ अंशांनी घट झाली आहे.
पुणे : राज्यातील थंडीचा कडाका वाढत असून नाशिकमध्ये हंगामातील निचांकी ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये तापमानात सरासरीपेक्षा ४.६ अंशांनी घट झाली आहे.
विदर्भातही थंडीची लाट आल्याचे हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे. ही लाट शनिवारीही कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही थंडी वाढली आहे. पुणे, गोंदिया, अकोला, परभणी, मालेगाव येथील तापमान ७ अंशापेक्षाही कमी नोंदले गेले.
शुक्रवारी राज्यातील हवामान कोरडे होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने तापमानात घट होऊन थंडी वाढली आहे. गेल्यावर्षी नाशिकमध्ये २९ डिसेंबरला निचांकी ६.५ अंश तापमान नोंदले गेले होते. नाशिकला १३ डिसेंबर १९८१ मध्ये सर्वात कमी ४.७ अंश तापमानाची नोंद झाली होती.
विदर्भात सर्व प्रमुख शहरांमधील तापमानात सरासरीपेक्षा ४ ते ६ अंशांनी घट झाली आहे. गोंदिया येथे ७.६, अकोला ८, नागपूर ८.१, ब्रह्मपुरी ९, वर्धा ९.६, तर अमरावतीत ११ अंश सेल्सिअस तापमान होते. मराठवाड्यातही परभणी येथे ८.२, औरंगाबाद ९.८, उस्मानाबाद ९.४, नांदेड ९.५ अंश सेल्सिअस असे तापमान होते. पुणेही गारठले
असून तेथे ७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मालेगावला ८, जळगाव ९.२, महाबळेश्वरला १०.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. मंगळवारपर्यंत राज्यात थंडीला पोषक असणारे कोरडे हवामान राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)