राज्यातील थंडीची लाट ओसरू लागली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 06:13 AM2019-01-15T06:13:57+5:302019-01-15T06:14:09+5:30
उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे वाहणारी थंडीची लाट ओसरली असून, देशासह राज्याच्या कोणत्याही भागाला शीत लहरीचा इशारा देण्यात आलेला नाही.
मुंबई : मुंबईचे किमान तापमान सोमवारी १५ अंश नोंदविण्यात आले असून, राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ९.२ अंश नोंदविण्यात आले.
महत्त्वाचे म्हणजे, उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे वाहणारी थंडीची लाट ओसरली असून, देशासह राज्याच्या कोणत्याही भागाला शीत लहरीचा इशारा देण्यात आलेला नाही. शीत लहर ओसरली असली, तरी राज्यातील किमान तापमानाचा पारा अद्याप खालीच असल्याचे चित्र तूर्तास तरी आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
१५ ते २० जानेवारी दरम्यान पुणे आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २७, ८ अंशाच्या आसपास राहील. १५ आणि १६ जानेवारी रोजी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३०, १५ अंशाच्या आसपास राहील. १५ ते १८ जानेवारी रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.