राज्यात थंडीचा कडाका; विठुरायालाही हुडहुडी!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 06:24 AM2018-12-03T06:24:43+5:302018-12-03T06:24:52+5:30
राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, साक्षात विठुरायालाही हुडहुडी भरली आहे.
पंढरपूर (जि. सोलापूर): राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, साक्षात विठुरायालाही हुडहुडी भरली आहे. या थंडीपासून बजाव व्हावा, म्हणून श्री विठ्ठल व रुक्मिणीच्या मूर्र्तींना काश्मिरी रजई, पश्मिना शाल आणि डोक्याला मुंडासे असा उबदार पोषाख चढविण्यात येत आहे. हे उबदार कपडे होळीपर्यंत घातले जाणार आहेत.
चार दिवसांपासून थंडी वाढत चालल्याने प्रक्षाळपूजेनंतर देवाला हे उबदार कपडे परिधान करण्यात येत आहे. रात्री शेजारतीनंतर विठुरायाच्या अंगावरील पोशाख काढून अंग पुसून घेतल्यावर, मूर्तीच्या डोक्यावरील मुकुट काढून तेथे १५० हात लांबीचे हे खास उबदार मुंडासे बांधण्यात येते, तसेच सुती उपरण्याची कानपट्टी बांधण्यात येते. पांढराशुभ्र उबदार शेला डोक्यापासून पायापर्यंत टाकण्यात आल्यानंतर शाल अंगावर टाकून त्यावर खास काश्मिरी रजई घालण्यात येते. देवाला नखशिखांत उबदारपणा जाणवेल, याची खबरदारी घेतली जाते. शेवटी तुळशीहार घालून आरती करून देवाला निद्रेसाठी सज्ज केले जाते. काकड आरतीच्या वेळी मूर्तीवरील उबदार कपडे, तसेच ठेवण्यात येतात.
>मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल-रुक्मिणी मातेस थंडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी शाल, कानपट्टी, रजई आदी उबदार कपडे घालण्यास सुरुवात केली आहे.
>परभणीचा पारा ९.५ अंशांवर
परभणीत थंडीची लाट पसरली असून, रविवारी जिल्ह्याचे किमान तापमान ९.५ अंश सेल्सियस होते. या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे थंडीचे प्रमाणही कमी राहील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, डिसेंबर महिना उजाडताच हुडहुडी भरविणारी थंडी जाणवू लागली आहे.
>प्रमुख शहरांतील किमान तापमान
पुणे १२़१, जळगाव १३़६, कोल्हापूर १७, महाबळेश्वर १३़९, मालेगाव १३़४, नाशिक ११़४, सांगली १३़९, सातारा १२़१, सोलापूर १६़६, मुंबई २२़५, अलिबाग १९़८, डहाणू १९, उस्मानाबाद १३़९, औरंगाबाद १०़८, परभणी १२़६, अकोला १५, अमरावती १४़८, बुलडाणा १५, ब्रह्मपुरी १४, चंद्रपूर १६, गोंदिया १२़२, नागपूर १२़७, वर्धा १४़५, यवतमाळ १३़़२ अंश सेल्सिअस.