विदर्भाला थंडीच्या लाटेचा इशारा; मुंबई १६ अंशांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 07:08 AM2018-12-23T07:08:02+5:302018-12-23T07:08:09+5:30
उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे वाहत असलेल्या शीत वाऱ्याचा परिणाम म्हणून २३ डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.
मुंंबई : उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे वाहत असलेल्या शीत वाऱ्याचा परिणाम म्हणून २३ डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. थंडीच्या लाटेचा प्रभाव म्हणून राज्यातील अनेक शहरांचे किमान तापमान १० अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असून, राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नागपूर येथे ६.३ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. तर मुंबईचे किमान तापमान १६.१ अंश नोंदविण्यात आल्याने येथील थंडीचा कडाका कायम आहे.
गेल्या २४ गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे, तर उर्वरित भागात लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले असून, अहमदनगर, जळगाव, मालेगाव, नाशिक, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ या शहरांचे किमान तापमान १० अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, २४ ते २६ डिसेंबरदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. २३ ते २४ डिसेंबरदरम्यान मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, १७ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.