थंडीची लाट येणार, महाराष्ट्र पुन्हा गारठणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 09:00 AM2022-01-31T09:00:56+5:302022-01-31T09:01:34+5:30
Cold wave in Maharashtra: राज्यात रविवारी सर्वात कमी किमान तापमान जळगाव येथे ५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, ३१ जानेवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे
मुंबई : राज्यात रविवारी सर्वात कमी किमान तापमान जळगाव येथे ५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, ३१ जानेवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे, तर मुंबईचे किमान तापमान आता सर्वसाधारण नोंदविण्यात येत असून, रात्रीच्या हवेत असलेल्या गारव्यामुळे मुंबईकरांना अजूनही थंडीचा मनमुराद आनंद लुटता येत आहे. गेल्या २४ तासात गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट होती. विदर्भात काही ठिकाणी व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी लक्षणीय घट झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.