थंडीने महाराष्ट्र गारठला; नागपूर ५, मुंबई २० अंश सेल्सिअस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 01:55 AM2019-12-29T01:55:31+5:302019-12-29T01:55:48+5:30
काही भागांत उल्लेखनीय वाढ
मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून हुलकावणी दिलेल्या थंडीने शनिवारी मात्र महाराष्ट्र गारठला. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नागपूर येथे ५.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, विदर्भातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान १० अंशांखाली घसरले आहे. दुसरीकडे मुंबई मात्र अद्यापही थंडीच्या प्रतीक्षेत असून, येथे म्हणावा तसा गारठा पडलेला नाही. शनिवारी मुंबईचे किमान तापमान २०.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, रविवारसह सोमवारी मुंबईचे किमान तापमान २१ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दिवाळीत थंडीची चाहूल लागते. पण यंदा दिवाळी सरली, जुने वर्ष संपत आले तरी थंडीचा महिना काही यायला तयार नव्हता. पण गेले दोन दिवस महाराष्टÑ काहीसा गारठू लागला आहे. त्यामुळे वर्षअखेर का होईना आला थंडीचा महिना असे चित्र राज्यात आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे; उर्वरित भागात लक्षणीय घट झाली आहे.
राज्यातील शहरांचे शनिवारचे
किमान तापमान (अंश सेल्सिअस)
नागपूर ५.१
गोंदिया ५.२
चंद्रपूर ५.४
ब्रह्मपुरी ६.९
वर्धा ७.५
अकोला ८.७
यवतमाळ ९
अमरावती ९.२
बुलडाणा ९.५
जळगाव १०.५
औरंगाबाद १०.९
वाशिम ११.२
परभणी ११.३
नाशिक ११.४
मालेगाव ११.६
नांदेड १४.५
महाबळेश्वर १५
पुणे १८.३
डहाणू १८.५
सोलापूर १९
कोल्हापूर १९.७
सातारा १९.७
सांगली २०.१
मुंबई २०.४
अलिबाग २०.७
२९ डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी थंड दिवस राहील. काही ठिकाणी थंडीची लाट येईल. ३१ डिसेंबर रोजी मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडेल. १ जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात व मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.