राज्यात पुन्हा गारवा; मुंबई १६, तर महाबळेश्वर १५ अंशांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 02:43 AM2021-01-17T02:43:46+5:302021-01-17T02:45:37+5:30
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, शनिवारी गोवा आणि महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाली.
मुंबई :मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा मध्यम स्वरूपाच्या थंडीची लाट दाखल हाेणार आहे. त्याची प्रचिती नागरिकांना शनिवारी आली. शनिवारी मुंबईचे किमान तापमान १६ तर महाबळेश्वरचे १५ अंशांवर नोंदविण्यात आले. सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ८.४ अंश सेल्सिअस एवढे हाेते.
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, शनिवारी गोवा आणि महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाली. मुंबईचे किमान तापमान खाली उतरले असून, ते १६ अंश नोंदविण्यात आल्याने येथील हवेत गारवा निर्माण झाला. राज्यातही किमान तापमानात घट झाली असून पुढील काही दिवसांत यात आणखी घट नोंदविण्यात येईल.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत प्रदूषणाचे प्रमाण वाढले होते, मुंबईकरांना उन्हाचा झळा सहन कराव्या लागत हाेत्या.
२० जानेवारीपासून थंडीची मध्यम लाट
२० जानेवारीपासून राज्यात पुन्हा थंडीची मध्यम लाट येण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ, उत्तर कोकणात थंडीचा प्रभाव राहील. २२ आणि २३ जानेवारी नंतर पुणे, नाशिक येथील पारा १२ अंशाखाली जाण्याची शक्यता आहे. मुंबई आणि परिसरातही किमान तापमानात घट होईल. ते १६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल, असे होसाळीकर यांनी सांगितले.
राज्यातील शहरांचे शनिवारचे किमान तापमान (अंश सेल्सिअस) -
- नाशिक १४.५, पुणे १६,
- बारामती १५.९, सातारा १६.७,
- महाबळेश्वर १५.८, उस्मानाबाद १५.४, औरंगाबाद १६.७,
- माथेरान १६.८, अमरावती १५.५, चंद्रपूर १३.६, गडचिरोली १३.२, गोंदिया ८.४, नागपूर १२.६, वर्धा १४, मुंबई १६.६.