कोसळधार !
By admin | Published: July 4, 2016 05:13 AM2016-07-04T05:13:07+5:302016-07-04T05:14:13+5:30
शनिवारी धो-धो कोसळलेल्या पावसाने रविवारी मात्र किंचितशी विश्रांती घेतली.
मुंबई : शनिवारी धो-धो कोसळलेल्या पावसाने रविवारी मात्र किंचितशी विश्रांती घेतली. दुपारी आणि सायंकाळी काही काळ पावसाने हजेरी लावली असली तरी त्याचे प्रमाण कमी होते. ठाणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाची रविवारीही जोरदार हजेरी कायम होती. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १३७ मिमी पावसाची नोंद झाली. रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ११७.८४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रविवारी अंबा आणि कुंडलिका या दोन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. मात्र नंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याची पातळी कमी झाली. नवी मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर रविवारी कमी झाला असला तरी संततधार सुरूच होती.
मुंबईत ऐन रविवारी पावसाने विश्रांती घेतल्याने घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांनी रविवारच्या सरींचा मनमुराद आनंद लुटला. तर दुसरीकडे अधून-मधून पावसाची सरी कोसळत असतानाच पडझडीच्या घटनाही घडल्या. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना झाली नाही. रविवारी झालेल्या पावसाची मुंबई शहरात ८.२६, पूर्व उपनगरात १२.७६ आणि पश्चिम उपनगरात १२.६० नोंद झाली आहे. मागील २४ तासांत पडलेल्या पावसामुळे शहरात ३, पूर्व उपनगरात ५ आणि पश्चिम उपनगरात ४ अशा एकूण १२ ठिकाणी भिंतीचा भाग पडला. शहरात ७, पूर्व उपनगरात २ आणि पश्चिम उपनगरात ४ अशा एकूण १३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात २४, पूर्व उपनगरात २२ आणि पश्चिम उपनगरात ५८ अशा एकूण १०४ ठिकाणी झाडे पडल्याच्या तक्रारी महापालिका नियंत्रण कक्षाकडे आल्या. दरम्यान, कांदिवली पश्चिमेकडील डॉ. बी.ए. रोडवरील सहयाद्री नगर येथे झाडे कोसळून झालेल्या दुर्घटनेत रिक्षाचालकासह महिला जखमी झाली. राजकुमार सिंग आणि शोभना पटेल अशी जखमींची नावे आहेत.
ठाणे जिल्ह्यात दुपारनंतर पुन्हा संततधार सुरू झाली. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड आणि भिवंडीमध्ये पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यात एकूण ९५८.२० मिमी पाऊस झाला आहे. यामध्ये ठाणे तालुक्यात १३२, कल्याण- १२२, मुरबाड- १५३, उल्हासनगर-१४८, अंबरनाथ- १४२.२०, भिवंडी- १७० आणि शहापूर- ९१ मिमी पाऊस नोंदवण्यात आला आहे. रविवारी दुपारपर्यंत ठाणे शहर ३७.५० मिमी पावसाची नोंद झाली. मुंब्य्रातील रेतीबंदर येथील राणानगर १, शंकर मंदिराजवळील राजन मारु ती पवार यांच्या घरावर डोंगरावरून भले मोठे दगड घसरून पडले. या घटनेत, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
>रायगड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. पाली तालुक्यात सर्वाधिक २३४ मि.मी. पाऊस पडल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. रोहे आणि माथेरानमध्ये अनुक्रमे १८६ आणि १२३ मि.मी. पावसाची नोंद झाली. फणसाड, वावा, सुतारवाडी, कोंडगाव, कवेळे, उन्हेरे, कुडकी, संदेरी, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे या लघुपाट बंधारे प्रकल्पाची अखत्यारीत असणारी धरणे दुथडी भरून वाहत आहेत. उर्वरित असणारी १६ धरणेही भरण्याच्या स्थितीमध्ये आहेत. पनवेल परिसरात मात्र पावसाचा जोर आजही कायम असल्याने हार्बर मार्गावरील गाड्या उशीराने धावत होत्या. सायन-पनवेल महामार्गावर काही ठिकाणी पाणी साचल्याने गैरसोय झाली.
>अनेक जलाशय भरू लागले
पुणे जिल्ह्यातील मुळशी,
पवना, कासारसाई, कलमोडी, भामाआसखेड आदी धरण क्षेत्रांत संततधार सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सांगली जिल्ह्यात रिमझिम सुरू असून, चांदोली धरणातील पाणी पातळी वेगाने वाढत आहे.
कोयना धरणाच्या पाणी पातळीत दोन टीएमसीने वाढ झाली आहे. नगर जिल्ह्यात भंडारदरा धरणात २४ तासांत जवळपास २२५ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. निळवंडे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली.
सर्वदूर पाऊस असल्याने शेतकरी २५ जुलैपर्यंत पेरण्या उरकू शकतो. या पावसामुळे जमिनीत ओल उतरत आहे़ त्यामुळे तो शेतीला उपयुक्त आहे. ओढे, नाले वाहू लागल्याने विहिरींनाही पाणी उतरेल.
- रामचंद्र साबळे,
कृषी हवामानतज्ज्ञ
>पाऊसमान (मि़मी़) : पुणे ७३.५, नाशिक ५८.०६, रतनवाडी (नगर) १२७, गगनबावडा (कोल्हापूर) १०९, कोयना (सातारा) १५६, चांदोली (सांगली) ७०, भंडारा ३५, अमरावती २९.७
>काहीशी चिंता : मराठवाडा तसेच सातारा, सांगली व नगरच्या पूर्व भागात मात्र अजून चांगला पाऊस झालेला नाही. त्यामुळे या भागात काहीशी चिंता आहे.