राजकारणामुळे सहकार चळवळीचा ऱ्हास - उपराष्ट्रपती
By admin | Published: July 8, 2016 09:05 PM2016-07-08T21:05:47+5:302016-07-08T21:05:47+5:30
एकेकाळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सहकारी चळवळ मागे पडू लागली आहे. सहकारी चळवळ मूळ उद्दीष्टांपासून भरकटली असून सरकारच्या उद्दीष्टपूर्तीची साधन झाली आहे
उपराष्ट्रपती मो.हामिद अन्सारी : नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या ५५ वा स्थापना दिन साजरा
नागपूर : एकेकाळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सहकारी चळवळ मागे पडू लागली आहे. सहकारी चळवळ मूळ उद्दीष्टांपासून भरकटली असून सरकारच्या उद्दीष्टपूर्तीची साधन झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सहकार क्षेत्राचा राजकीय फायद्यासाठी वापर वाढला आहे. राजकारणामुळे सहकारी चळवळीचा ऱ्हास होत आहे, असे परखड मत देशाचे उपराष्ट्रपती मो.हामिद अन्सारी यांनी व्यक्त केले. नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या ५५ व्या स्थापना दिवस समारंभादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
देश घडवणाऱ्या नेत्यांनी सहकारी चळवळीकडे वेगाने आर्थिक विकास करण्याचे साधन म्हणून बघितले होते. स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काही दशकांत देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचा मौलिक वाटा होता. महाराष्ट्राने तर या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. परंतु त्यानंतर सहकार क्षेत्रातून काही ठराविक व्यक्तींनाच फायदा होत गेला. तळागाळातील सहकार कमकुवत होत गेला. आर्थिक उदारीकरणानंतर खासगीकरणाचे सहकारासमोर मोठे आव्हान उभे ठाकले. त्यातच प्राथमिक स्वरूपाच्या कृषी पतसंस्थांकडील साधनसामुग्रीची उणीव, व्यावसायिक व्यवस्थापन कौशल्याचा अभाव यामुळे सहकार क्षेत्र आणखी माघारत गेले, असे प्रतिपादन उपराष्ट्रपतींनी केले.
महाराष्ट्रात राजकीय नेत्यांमुळे सहकारी चळवळ चांगलीच फोफावली व सहकारी क्षेत्राने प्रचंड प्रगती केली. परंतु गुजरात, कर्नाटक वगळता देशाच्या इतर राज्यांत हे चित्र दिसले नाही. वंचितांचे जीवन सुधारण्यासाठी सहकारी बँकांनी मोठे योगदान दिले आहे. काही मोजक्या बँकांमुळे सहकारी बँकांबाबत गैरसमज आहेत. परंतु देशाच्या विकासात या क्षेत्राची मौलिक भुमिका आहे. रोजगार निर्माण करणाऱ्या आर्थिक धोरणाचा स्विकार करण्याची आमची भुमिका आहे, असे गडकरी म्हणाले.
नागपुरातच देशाचे केंद्र
ब्रिटीशांच्या काळात नागपूर देशाच्या केंद्रस्थानी होते. आता देशाचे भौगोलिक केंद्र थोडे वेगळे असले तरी लोक नागपुरलाच खरे केंद्र मानतात असे प्रतिपादन उपराष्ट्रपतींनी केले. त्यांचा रोख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे असल्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला. विशेष म्हणजे संघाचे अनेक स्थानिक पदाधिकारी यावेळी श्रोत्यांमध्ये उपस्थित होते.
.