गडकरींचा पुतळा तोडणारे संकुचित - मुख्यमंत्री
By Admin | Published: January 4, 2017 09:06 PM2017-01-04T21:06:10+5:302017-01-04T21:13:56+5:30
पुण्यातील संभाजी उद्यानात असलेल्या राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडणारे संकुचित असून त्यांचा शोध घेऊ असे, म्हणत संभाजी ब्रिगेडवर निशाना साधला.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 04 - पुण्यातील संभाजी उद्यानात असलेल्या राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडणारे संकुचित विचारसरणीचे असून त्यांचा शोध घेऊ, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी ब्रिगेडवर निशाना साधला. येथील वडगाव शेरीमध्ये टॉय ट्रेनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
शिवराय जाती-धर्मापलीकडचे देव असून त्यांना काही लोक संकुचित विचारांनी जाती-धर्मात बांधून ठेवतात. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं जीवन आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. मात्र काही जणांना ते दोघेही समजलेच नाहीत, अशी टीकाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.
याचबरोबर नोटाबंदीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला टोला हाणला. ते म्हणाले की, सामान्य माणूस नोटाबंदीचा त्रास सहन करतो, पण काही लोकांना याचा फार त्रास होतो. त्यांना माझा प्रश्न आहे की, ‘तुमचं समर्थन भ्रष्टाचाराला आहे की, भ्रष्टाचार मुक्तीला?’ एकदा काय ते तुमची भूमिका स्पष्ट करा. तसेच नोटाबंदीमुळे बँकांमध्ये पैसे आले. कर्ज कमी होत आहे. काळ्या पैसेवाल्यांच्या नोटांची रद्दी होत असेल तर तुमच्या पोटात का दुखतं? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. पुणे आणि नाशिकच्या विकास आराखड्यांना मंजुरी देण्यात आल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.