छंद बुद्धमूर्ती संग्रहाचा !
By Admin | Published: May 21, 2016 12:47 AM2016-05-21T00:47:44+5:302016-05-21T00:47:44+5:30
छंद ही व्यक्तिगत नैसर्गिक आवड, अभिरुचीची बाब. छंदातून व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, विचारधारणा, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार होतो
पुणे : छंद ही व्यक्तिगत नैसर्गिक आवड, अभिरुचीची बाब. छंदातून व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, विचारधारणा, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार होतो. आंतरिक ऊर्मीतून आयुष्याची लय साधत जोपासलेला गौतम बुद्धांच्या मूर्तींच्या संग्रहाचा छंद आयुष्यातलं खरंखुरं समाधान मिळवून देणारा आहे, असे मत गौतमबुद्धांच्या मूर्तीचे संग्राहक दिलीप वानखेडे यांनी गौतम बुद्धांच्या २५६०व्या जयंतीनिमित्ताने व्यक्त केले.
एक इंचापासून सहा फुटांपर्यंतच्या गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्रांतील मूर्ती, चार हजारांहून अधिक पुस्तके, कॅलेंडरमधील फोटो, कात्रणे, बुद्धांची प्राचीन चित्रे, टपाल तिकिटे असा अमूल्य ठेवा गौतम बुद्धांच्या तत्त्वांची, त्यांनी दिलेल्या शांतीच्या संदेशाची आठवण करून देतो. दिलीप वानखेडे यांचा हा अनोखा संग्रह थक्क करायला लावणारा आहे. मालधक्का येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात हा अनोखा ठेवा आहे.
३० वर्षांपूर्वीपासूनच वानखेडे यांना मूर्तींचा संग्रह करण्याचा छंद जडला. दिवसेंदिवस हा छंद अधिकच गहिरा होत गेला. १०८ रूपांतील भावमुद्रा बुद्धांच्या मूर्तींतून व्यक्त होतात. सध्या वानखेडे यांच्याकडे १ इंच ते ६ फुटांच्या सुमारे १२०० मूर्ती आणि ३-४ हजार पुस्तके आहेत.
>विविध देशांतून आणल्या मूर्ती
या संग्रहालयात बुद्धांच्या विविध मूर्ती पाहायला मिळतात. तैवानला गौतम बुद्धांच्या सुमारे २८,००० मूर्तींचे जगातील पहिल्या क्रमांकाचे संग्रहालय आहे. त्यानंतर आंबेडकर सांस्कृतिक भवनातील संग्रहालय हे बहुधा भारतातील सर्वांत मोठे संग्रहालय असावे.
या संग्रहालयात थायलंड, जपान, कंबोडिया आदी देशांमधून आणलेल्या धातूच्या, दगडी तसेच लाकडी मूर्तींचा समावेश आहे. बुद्धांच्या मूर्तीबरोबरच सध्या दिलीप वानखेडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो संग्रहित करण्याचा छंद जडला आहे.
१९९०मध्ये आंबेडकरांची प्रतिमा असलेले १ रुपयाचे नाणे चलनात आले होते. अशी १५ हजार नाणी वानखेडे यांच्याकडे आहेत. या संग्रहाची नोंद लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे.
वानखेडे यांच्या संग्रहालयाला पीएचडी, तसेच यूपीएससी, एमपीएससीचे विद्यार्थी आवर्जून भेट देतात. अभ्यासासाठी त्यांना येथील पुस्तकांचा खूप उपयोग होतो. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरही हे विद्यार्थी आठवणीने दिलीप वानखेडे यांना भेटायला येतात.