१५१ जणांची सामूहिक दशक्रिया
By admin | Published: August 11, 2014 03:18 AM2014-08-11T03:18:26+5:302014-08-11T03:18:26+5:30
माळीण दुर्घटनेत मरण पावलेल्या १५१ जणांचा माळीण फाट्यावर बुब्रानदी काठी सकाळी सामूहिक दशक्रिया विधी झाला
घोडेगाव : माळीण दुर्घटनेत मरण पावलेल्या १५१ जणांचा माळीण फाट्यावर बुब्रानदी काठी सकाळी सामूहिक दशक्रिया विधी झाला. या वेळी पाच ते सहा हजार लोकांचा समुदाय येथे जमला होता.
सर्व मृतांचे एकच पिंड बनवून दशक्रिया विधी करण्यात आला. या वेळी ह.भ.प. वैभवमहाराज राक्षे यांचे प्रवचन झाले. या वेळी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाधिकारी सौरभ राव आदी उपस्थित होते.
या भागातील आदिवासींना दरवर्षी पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तींना सामोरे जावे लागते, त्यातूनही हे लोक पुन्हा उभे राहतात; त्याप्रमाणे माळीण गावही उभे राहील. ग्रामस्थांचे पुनर्वसन, उपजीविकेचे साधन यासाठी सर्व मदत केली जाईल, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.
माळीणमध्ये १५१ लोकांचा स्मृतिस्तंभ, स्मारक उभे केले जाईल. गाव जे सांगेल तसे पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही पिचड यांनी दिली. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे एलआयसीकडे दावे करण्यासंदर्भात वारसदारांना आवश्यक ती मदत केली जाईल व लोकांना लवकरात लवकर याचे पैसे दिले जातील, असे विकास अधिकारी रघुनाथ काकडे यांनी सांगितले. या वेळी संजय झांजरे या युवकाने माळीण दुर्घटनेत मदत केलेल्या सर्व लोकांचे आभार मानले. (प्रतिनिधी)