निष्ठावंतांची कुचंबणा! राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या २० पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 04:49 PM2022-03-17T16:49:08+5:302022-03-17T21:28:26+5:30
उस्मानाबाद : ‘राष्ट्रवादी महिला काँग्रेसमध्ये निष्ठावंतांची कुचंबणा होत असून, अपमानास्पद पद्धतीने पदाधिकाऱ्यांना पदावरून काढले जात आहे. त्यामुळे आम्ही पदांचा ...
उस्मानाबाद : ‘राष्ट्रवादी महिला काँग्रेसमध्ये निष्ठावंतांची कुचंबणा होत असून, अपमानास्पद पद्धतीने पदाधिकाऱ्यांना पदावरून काढले जात आहे. त्यामुळे आम्ही पदांचा सामूहिक राजीनामा देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा ॲड. मंजूषा मगर व तालुकाध्यक्षा सुरेखा जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बुधवारी सुरेखा जाधव यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बाेलत हाेत्या. यावेळी उस्मानाबाद शहराध्यक्षा वंदना डोके, कळंब तालुकाध्यक्षा मनीषा साळुंके, प्रीती गायकवाड, अफसाना पठाण, ज्योती माळाळे, ऋतुजा भिसे, स्वाती भातलवंडे, बालाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती हाेती. जिल्हाध्यक्षा ॲड. मगर-माडजे म्हणाल्या, ‘जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आम्ही सर्व महिला राष्ट्रवादी काँग्रेससोबत निष्ठेने उभा राहिल्या आहोत, असे असताना राज्यपातळीवरून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या जागी इतर महिलांची नियुक्ती केली जात आहे.
किमान विश्वासात घेणे किंवा कल्पना देऊन नवीन नेमणूक केल्यास काही वाटले नसते. परंतु कोणतीही कल्पना न देता अत्यंत अपमानास्पदरीत्या इतरांची नियुक्ती करणे योग्य नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. याबाबत जयसिंगराव गायकवाड व सक्षणा सलगर यांना कल्पना दिली आहे,’ असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसमधील २० पदाधिकारी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
वैयक्तिक कारणास्तव राजीनामा
मंजुषा मगर यांनी वैयक्तिक कारणासाठी स्वत:हून राजीनामा दिला आहे, याची प्रतही आमच्याकडे आहे. तसेच, त्यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लोकमतला दिली.