महाविद्यालय शुल्कवाढीची टांगती तलवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 09:02 PM2019-12-14T21:02:00+5:302019-12-14T21:10:01+5:30
अनेक गरीब विद्यार्थ्यांना पारंपरिक अभ्यासक्रमाचे शुल्क भरणे जात आहे अवघड
पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या शुल्क वाढीचा ठराव विद्यापीठाच्या शुल्क निर्धारण समितीकडे पाठवण्याचा निर्णय गुरूवारी विद्यापीठाच्या अधिसभेत घेण्यात आला.या समितीसमोर समाजातील सर्व घटकांना आपले म्हणणे मांडण्याची संधी विद्यापीठातर्फे दिली जाणार आहे.त्यानंतरच शुल्कवाढ करावी किंवा नाही यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.त्यामुळे महाविद्यालय शुल्कवाढीची टांगती तलवार अजूनही कायम आहे.
विद्यापीठाशी संलग्न माहविद्यालयांमधील व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांची शुल्कवाढ करावी,असा ठराव शनिवारी विद्यापीठाच्या अधिसभेत मांडण्यात आला. मात्र,ओला दुष्काळ आणि आर्थिक दुर्बलतेमुळे सध्या अनेक गरीब विद्यार्थ्यांना पारंपरिक अभ्यासक्रमाचे शुल्क भरणे अवघड जात आहे. त्यामुळे काही अधिसभा सदस्यांनी गदारोळ करत शुल्कवाढीला विरोध केला.तर संस्थाचालक व प्राचार्यांनी शुल्कवाढ झाली पाहिजे,अशी भूमिका मांडली. सभागृहात दोन गट निर्माण झाल्याने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी हा ठराव शुल्क निर्धारण समितीकडे पाठविण्याचे जाहीर केले. त्यामुळे शुल्कवाढीबाबत विद्यार्थ्यांवर टांगती तलवार कायम आहे.
विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ.प्रकाश पाटील यांनी 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 30 टक्के तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 20 टक्के शुल्कवाढ करण्याचा ठराव अधिसभेत मांडला. गेल्या दहा वर्षापासून विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांची शुल्क वाढी केली नाही. त्यामुळे प्राध्यापकांना वेतन देणे आणि विद्यार्थ्यांना आवश्यक सोई-सुविधा देणे शक्य होत नसल्याचे मत व्यक्त केले. तसेच अधिसभा सदस्य डॉ. शामकांत देशमुख यांनी सुध्दा शुल्कवाढ करण्याची आवश्यकता असल्याची भूमिका मांडली. विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.सुधाकर जाधवर यांनी संलग्न महाविद्यालयांची शुल्क पुनर्रचना करवी, असे मत व्यक्त करत यावर शुल्क निर्धारण समितीला व चारही अधिष्ठात्यांना निर्णय घेऊ द्यावा, असे सभागृहात सांगितले. मात्र,अधिसभा सदस्य संतोष ढोरे,शशिकांत तिकोटे यांच्यासह काही सदस्यांनी शुल्कवाढीच्या ठरावाला विरोध केला.
------------------------------
मी शुल्कवाढीच्या बाजूचा नाही
काशीनाथ कँटीनच्या ब्रेडचे तुकडे खाऊन मी शिक्षण घेतले आहे. त्यामुळे शुल्कवाढ केल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणे अवघड जाते, याची मला पूर्ण जाणीव आहे. मी स्वत: शुल्कवाढीच्या बाजूचा नाही. परंतु, सभागृहातील सदस्यांच्या भावना विचारात घेऊन शुल्क निर्धारण समितीकडे शुल्कवाढी संदर्भातील ठराव अभ्यासासाठी पाठविला जाईल. या समितीकडे विद्यार्थी,शिक्षक,प्राचार्य, संस्थाचालक,विद्यार्थी संघटना यांच्यासह समाजातील सर्व घटकांना आपली भूमिका मांडता येईल.- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
.....
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना आजही प्रवेश शुल्क भरता येत नाही.राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.शुल्कवाढ केल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार नाही.त्यामुळे शुल्कवाढीचा ठराव नामंजूर करावा.शुल्कवाढीमुळे विद्यार्थी वर्गात उद्रेक होईल; याचा विद्यापीठाने विचार करावा. - संतोष ढोरे,अधिसभा सदस्य,