महाविद्यालयांची शासनाकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2016 01:02 AM2016-08-26T01:02:09+5:302016-08-26T01:02:09+5:30
नापासांचा शिक्का पुसण्यासाठी प्रथमच घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेत राज्यातून ३२ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
पुणे : नापासांचा शिक्का पुसण्यासाठी प्रथमच घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेत राज्यातून ३२ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र, महाविद्यालयांची प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्याने या विद्यार्थ्यांना प्रवेश राज्यातील महाविद्यालयांकडून राज्य शासनाकडे जागा वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
फेरपरीक्षेच्या निकालात राज्यभरातून ३२ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुणे विभागात ६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात प्रवेश देताना महाविद्यालयांना वेगळे नियोजन करावे लागेल. बहुतांश महाविद्यालयांतील प्रवेश फुल झाल्याने प्रवेशाच्या अडचणी वाढल्या आहेत. यावर उपाय म्हणून महाविद्यालयांनी जागा वाढवून देण्याची मागणी शासनाकडे केली आहे. याबाबत शासनाकडून काय प्रतिसाद येतो, याकडे लक्ष लागले आहे. उच्च शिक्षण विभागाकडूनही विद्यापीठांना सूचना न मिळाल्याने प्रवेशप्रक्रिया खोळंबण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रथम वर्षाची महाविद्यालये सुरू होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी उलटला आहे. उच्च शिक्षण विभागाने ऐन वेळी विद्यापीठांना सूचना देऊन ऐन वेळी पुरवणी परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठीची प्रवेशप्रक्रिया राबवा, अशा सूचना देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, विलंबाने प्रवेश घेणाऱ्या या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी महाविद्यालयांना पेलावी लागणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांनीच तातडीने जागा वाढविण्यासाठी शासनालाच साकडे घातले आहे.
महाविद्यालयाने नियमित विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण केले आहेत. फेरपरीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी स्वतंत्र नियोजन करावे लागणार आहे. यासाठी आम्ही शासन आदेशाच्या प्रतीक्षेत आहोत. या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा असेल, तर शासनाने जागा वाढवून द्यायला हव्यात. तसे पत्र शासनाला पाठविण्यात आले आहे. शासनाकडून प्रतिसाद येईपर्यंत प्रवेशप्रक्रिया राबविता येणे शक्य नाही.
- प्रा. दिलीप सेठ, प्राचार्य, सर परशुरामभाऊ महाविद्यालय