कॉलेज विद्यार्थ्याची प्रेमप्रकरणातून हत्या
By admin | Published: January 25, 2017 04:13 AM2017-01-25T04:13:33+5:302017-01-25T04:13:33+5:30
पूर्वेतील सागर्ली येथील साउथ इंडियन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका तरुणाची प्रेमप्रकरणातून मंगळवारी दुपारी १२.३०च्या सुमारास कॉलेजबाहेरच शस्त्राने भोसकून हत्या
डोंबिवली : पूर्वेतील सागर्ली येथील साउथ इंडियन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका तरुणाची प्रेमप्रकरणातून मंगळवारी दुपारी १२.३०च्या सुमारास कॉलेजबाहेरच शस्त्राने भोसकून हत्या केली. प्रणय सुरेश मोरे (२०, रा. जलाराम आशिष बिल्डिंग, गुप्ते रोड, डोंबिवली पश्चिम) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. दोन तरुणांनी ही हत्या केली असून त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनी दिली.
प्रणय साउथ इंडियन कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत प्रथम वर्षाला शिकत होता. कॉलेज सुटल्यानंतर मंगळवारी दुपारी तो मित्रांसह कॉलेजच्या इमारतीजवळ बोलत उभा होता. त्या वेळी तेथे आलेल्या दोन तरुणांनी बोलण्याचे निमित्त सांगून त्याला बाजूला नेले. बाजूला नेल्यानंतर तेथेच त्यांनी त्याच्या डोक्यात, पोटात, पाठीत, हातावर शस्त्राने नऊ वार केले. हा हल्ला केल्यानंतर हे मारेकरी पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रणयला मित्रांनी जिमखान्याजवळील खासगी रुग्णालयात तातडीने दाखल केले. मात्र, रक्तस्राव खूप झाल्याने त्याचा उपचारादरम्यान काही वेळातच मृत्यू झाला.
प्रणयवर हल्ला झाल्याची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरताच त्याला पाहण्यासाठी रुग्णालयाबाहेर त्याच्या मित्रांनी आणि नातेवाइकांनी गर्दी केली होती. मानपाडा पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून दोन अनोळखी तरुणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला.
प्रणयचे आई आणि वडील दोघेही खासगी कंपनीत कामाला आहेत. लहान भाऊ निशांत शिक्षण घेत आहे. ‘दोनच दिवसांपूर्वी मी कॉलेजमध्ये पालकसभेला येऊन गेलो. मात्र, असे काही घडेल याची कोणतीच कल्पना आली नाही,’ असे त्याचे वडील सुरेश मोरे यांनी पत्रकारांना सांगितले. (प्रतिनिधी)