महाविद्यालयीन विद्यार्थी असुरक्षितच

By admin | Published: April 5, 2017 01:23 AM2017-04-05T01:23:01+5:302017-04-05T01:23:01+5:30

हिंजवडी आयटी पार्क, तळवडे सॉफ्टवेअर पार्कमध्ये काम करणाऱ्या तरुणींवर हल्ले होण्याच्या घटना घडल्या

College students are unsafe | महाविद्यालयीन विद्यार्थी असुरक्षितच

महाविद्यालयीन विद्यार्थी असुरक्षितच

Next

पिंपरी : हिंजवडी आयटी पार्क, तळवडे सॉफ्टवेअर पार्कमध्ये काम करणाऱ्या तरुणींवर हल्ले होण्याच्या घटना घडल्या. तळवडे येथे अंतरा दास या अभियंता तरुणीच्या खुनाच्या घटनेपाठोपाठ हिंजवडीत रसिला राजू या अभियंता तरुणीचा तेथील रखवालदाराने गळा आवळून खून केला. या घटनेमुळे उद्योगनगरी परिसरातील तरुणींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर पोलिसांनी महिला सुरक्षितेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या. मात्र, या योजना अपुऱ्या पडत असल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनावरून दिसून येत आहे. ताथवडेतील ताज्या घटनेने महाविद्यालयीन विद्यार्थिनींमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
हिंजवडीत रसिला ओपी या तरुणीचा रखवालदाराने गळा आवळून खून केल्याच्या घटनेनंतर पुणे शहर पोलिसांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर दखल घेतली. आयटी कंपन्यांच्या परिसरात पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी स्वत: महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भातील जनजागृतीसाठी पुढाकार घेतला. ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम राबवला. आयटी कंपन्यांमधील तरुण-तरुणींशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कंपनी व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांना सुरक्षेसंबंधी दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. कंपनी व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली. एवढेच नव्हे तर या भागासाठी ‘बडी कॉप’ सेवा सुरू केली.
या परिसरात पोलिसांची गस्त वाढवली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी तातडीची मदत उपलब्ध होण्याकरिता प्रतिसाद अ‍ॅपचा वापर करण्याचे मार्गदर्शन केले.
पोलिसांच्या वतीने या उपाययोजना केल्यानंतरही याच भागात महाविद्यालय परिसरात अश्विनी या तरुणीवर प्राणघातक हल्ला झाला. ताथवडेतील
बालाजी महाविद्यालयात शिकणाऱ्या अश्विनी बोदकुरवार हिच्यावर
हल्ला झाल्याच्या घटनेने पुण्यात नोकरीसाठी अथवा शिक्षणासाठी आलेल्या तरुणी सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
हिंजवडीत दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या आयटी अभियंता तरुणीच्या खून प्रकरणात त्याच कंपनीत काम करणाऱ्या रखवालदार तरुणाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. ताथवडेतील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अश्विनी या तरुणीवर प्राणघातक हल्ल्याची घटना नुकतीच घडली. या दोन्ही घटनांमध्ये बाहेरील गुन्हेगारांचा सहभाग नाही. परिचयाच्या व्यक्तींनी असे कृत्य केले आहे. त्यामुळे अशा घटनांवर नियंत्रणासाठी वेगळ्या स्वरूपाच्या उपाययोजना कराव्या लागतील. - गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त, परिमंडल तीन
महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुण-तरुणींनी आपण शिक्षणासाठी दूरवरून आलो आहे, याचे भान ठेवून शिक्षणाला प्राधान्य द्यावे़ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीने नियमित गस्त सुरू असते़ तसेच दामिनी पथकाच्या माध्यमातून समुपदेशन केले जाते. तसेच महाविद्यालय परिसर सोडून विद्यार्थ्यांनी निर्जन ठिकाणी जाऊ नये.
- संदीप येडे पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, लोणावळा ग्रामीण
>लोणावळा : लोणावळ्याजवळील कुसगाव येथील सिंहगड महाविद्यालयात मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्गात शिकणारा विद्यार्थी सार्थक वाकचौरे व संगणकीय अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी श्रुती डुंबरे यांचा निर्घृण खून करणाऱ्या नराधमांना तत्काळ अटक करून त्यांचा खटला जलदगती न्यायालयात चालवा, या मागणीचे निवेदन देण्यासाठी महाविद्यालयातील जवळपास चार ते साडेचार हजार विद्यार्थ्यांनी कॅम्पसप्रमुख प्रज्ञा कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये सिंहगड महाविद्यालय ते शहर पोलीस ठाण्यापर्यंत कँडल मार्च मोर्चा शांततेच्या मार्गाने काढत तपास अधिकारी चंद्रकांत जाधव यांना निवेदन दिले.

Web Title: College students are unsafe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.