काॅलेज विद्यार्थ्यांसाठी सोमवारपासून कोरोना लसीकरण मोहीम राबवणार- उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 07:53 AM2021-10-21T07:53:48+5:302021-10-21T07:54:12+5:30
महाविद्यालयांतील पहिला ऑफलाईन वर्ग संवादाचा
मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागासोबत बैठक घेऊन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी, येत्या ७ ते ८ दिवसात म्हणजेच २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान व्यापक लसीकरण मोहीम राबविणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
बुधवारी सिडनेहॅम महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या मोहिमेतून प्रत्येक महाविद्यालयात तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लस उपलब्ध होईल याची काळजी घेतली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्यस्थितीत ज्या विद्यार्थ्यांनी लसीचे २ डोस पूर्ण केले आहेत त्यांनी सामाजिक अंतर राखून, मास्क लावून वर्गात उपस्थिती लावावी, असे उदय सामंत आवाहन केले आहे. महाविद्यालयानाही विद्यार्थी पालक यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करावा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. विद्यापीठांची वसतिगृहे ही टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत असून दिवाळीनंतर ती पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे उपस्थित राहून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने फार्मसी, अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक अशा ३६ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. व्हीजेटीआय संस्थेतील जे विद्यार्थी एमएचटी सीईटी परीक्षेत पहिल्या २० विद्यार्थ्यांमध्ये असतील त्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची घोषणा सामंत यांनी यावेळी केली.
‘लोकल प्रवासाचा प्रश्न २-३ दिवसांत सुटेल’
महाविद्यालये सुरू झाली असली तरी विद्यार्थ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्यात काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा झाली आहे. जे विद्यार्थी महाविद्यालयासाठी प्रवास करत आहेत, त्यांनी त्यांचे लसीकरण प्रमाणपत्र दाखवल्यावर तिकीट द्यावे, अशी मागणी करणारे पत्र आम्ही मुख्य सचिवांना दिले आहे. ही समस्या येत्या दोन-तीन दिवसात मार्गी लागणार आहे असे आश्वासन सामंत यांनी यावेळी दिले.
विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षण मंत्र्यांची उत्तरे
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ऑनलाईन - ऑफलाईन परीक्षा, कोरोनानंतरच्या काळातील नोकरीच्या संधी अशा विविध विषयांवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कोविड काळानंतरच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होणार यासंदर्भात उत्तर देताना आवश्यकता असेल तिथेच परीक्षा ऑनलाईन घेण्याचा विचार करू अन्यथा यापुढील परीक्षा ऑफलाईन स्वरूपातच होतील.
अनेक विद्यार्थ्यांना कोविड बॅच म्हणून नोकरीत डावलले जाण्याची भीती वाटत आहे, यावर विद्यार्थ्यांची भीती दूर करताना जे खासगी उद्योजक विद्यार्थ्यांना पुढील काळात या कारणाने नोकरी नाकारतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सामंत यांनी दिला आहे. शासकीय संस्थांकडून विद्यार्थ्यांना डावलले जाण्याचा प्रश्नच येणार नसल्याने विद्यार्थ्यांना निश्चिंत रहावे, असा दिलासाही त्यांनी दिला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण केव्हापासून व कसे राबविले जाणार याचे उत्तर देताना ३ टप्प्यांत ते राबविले जाणार आहे. पहिल्या टप्प्याची कारवाई लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.