कॉलेजांमध्ये आजपासून गजबज; दीड वर्षांनंतर कट्ट्यांवर धमाल, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 07:01 AM2021-10-20T07:01:57+5:302021-10-20T07:04:19+5:30
लसीच्या अटीमुळे उपस्थितीवर मर्यादा
मुंबई : तब्बल दीड वर्षाहून अधिक काळानंतर बुधवारी महाविद्यालयांचे कट्टे विद्यार्थ्यांनी फुलणार असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्याचवेळी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही संपूर्ण तयारी केली आहे. मात्र, लसीचे दोन्ही डोस घेतलेले १८ वर्षांवरील विद्यार्थी महाविद्यालयांत उपस्थित राहू शकणार असल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीला मर्यादा येणार आहे.
राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिलेल्या परवानगीनंतर व निर्देशांप्रमाणे मुंबई विद्यापीठासह इतर विद्यापीठांनी आपापल्या परिक्षेत्रातील संलग्नित महाविद्यालयांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याप्रमाणे इतके दिवस बंद असलेल्या महाविद्यालयांत साफसफाई, खोल्यांचे निर्जंतुकीकरण, जंतुनाशक फवारणीची कामे सुरू आहेत.
येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी, शारीरिक तापमान, तोंडावर मास्क आदींची तपासणी काटेकोरपणे केली जाणार आहे. या प्राथमिक उपाययोजनांसह लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याची परवानगी मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा असल्याचे या आधीच स्पष्ट करण्यात आले आहे.
कृषी महाविद्यालयेही आजपासून सुरू
राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालये, तसेच विद्यालये बुधवारी सुरू होत आहेत. कोरोनामुळे सर्व वर्ग मागील दोन वर्षे बंद होते.
ती सुरू करताना काही अटीही घातल्या आहेत. त्यात १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांनी कोरोना विरोधी लसीचे दोन डोस घेतलेले असावेत. ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपस्थिती लावणे शक्य होणार नाही, त्यांच्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी.
५० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित ठेवायचे असतील, तर संबंधित आस्थापनांनी स्थानिक अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून त्याविषयी निर्णय घ्यावा.
अशी घ्यावी काळजी
लसीचे २ डोस पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात उपस्थितीची परवानगी नसली तरी त्यांचे ऑनलाइन वर्ग सुरू ठेवण्याची तयारी करणे आवश्यक असणार आहे.
ज्यांचे लसीकरण झालेले नाही किंवा लसीचा दुुसरा डोस बाकी आहे. त्यांना महाविद्यालयांमार्फत लसीकरणाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महाविद्यालयांत वैद्यकीय कक्ष आवश्यक असून विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ मास्क घालणे व सामाजिक अंतर राखणे बंधनकारक असणार आहे.
यूजीसी व शासनाने कोविड १९ संबंधित दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन आवश्यक आहे.
एका दिवसात अभ्यासक्रम पूर्ण करायचा का?
पुणे विद्यापीठाने चालू सत्राचा अभ्यासक्रम विहीत काळात शिकवून पूर्ण करण्याची जबाबदारी सर्व प्राचार्य व प्राध्यापकांवर टाकली आहे. २० ऑक्टोबर रोजी महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी कला, वाणिज्य आणि विज्ञान या अभ्यासक्रमांचे पहिले सत्र २० ऑक्टोबर रोजीच संपणार आहे. त्यामुळे एका दिवसात अभ्यासक्रम पूर्ण करायचा का, असा सवाल प्राचार्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
दुकाने रात्री ११; तर हॉटेल रात्री १२ पर्यंत सुरू
मुंबई : सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ पर्यंत, तर हॉटेल, रेस्टॉरंट रात्री १२ पर्यंत सुरू ठेवण्यास राज्य शासनाने अनुमती दिली आहे. हा आदेश तत्काळ लागू झाला आहे. दुकाने आणि हॉटेल, रेस्टॉरंटच्या वेळा वाढवून देण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोमवारी दिले होते.
त्यानुसार मंगळवारी आदेश निघाला. या वेळांमध्ये परिस्थिती पाहून कपात करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला असतील; पण वेळ वाढवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची परवानगी आवश्यक राहील.